मोदी अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान : नेने, सांगलीत सावरकर साहित्य संमेलनास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 04:49 PM2018-04-21T16:49:30+5:302018-04-21T16:49:30+5:30
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेने आपल्या देशाला दर्जेदार दळणवळण व्यवस्था देऊ केली होती. मात्र, त्यावेळी सत्तेवर आलेल्यांनी अमेरिकेऐवजी रशियाबरोबर आपले संबंध प्रस्थापित केले. या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले, ही चूक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सुधारली व आता नरेंद्र मोदी त्यासाठी प्रयत्न करत असताना देशातील सर्व विरोधक मोदींविरोधात एकत्र येत आहेत. उलट नरेंद्र मोदी हे अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान असल्याचे प्रतिपादन ३० व्या स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दा. वि. नेने यांनी शनिवारी येथे केले.
सांगली : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेने आपल्या देशाला दर्जेदार दळणवळण व्यवस्था देऊ केली होती. मात्र, त्यावेळी सत्तेवर आलेल्यांनी अमेरिकेऐवजी रशियाबरोबर आपले संबंध प्रस्थापित केले. या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले, ही चूक अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सुधारली व आता नरेंद्र मोदी त्यासाठी प्रयत्न करत असताना देशातील सर्व विरोधक मोदींविरोधात एकत्र येत आहेत. उलट नरेंद्र मोदी हे अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान असल्याचे प्रतिपादन ३० व्या स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दा. वि. नेने यांनी शनिवारी येथे केले.
३० व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून नेने बोलत होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक सोलापूरचे खा. शरद बनसोडे, स्वागताध्यक्ष तथा खा. संजयकाका पाटील, कार्याध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेने पुढे म्हणाले की, २०१४ पर्यंत बोलण्याची हिंमत कोणाच्यात नव्हती मात्र, त्यानंतर ती आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोक अधिक प्रशिक्षीत नसल्याने लोकशाही लादली गेली. स्वातंत्र्याअगोदर अमेरिका आपला मित्र होता मात्र, त्यावेळच्या सत्ताधारी लोकांनी अमेरिकेऐवजी रशियाशी मैत्रीचे संबंध ठेवले. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर ही चूक सुधारण्यास सुरूवात झाली. आता नरेंद्र मोदीही त्यासाठी प्रयत्नशील असताना सर्व विरोधक एकत्र येत विरोध करत आहेत. मोदींनी काळा पैशावर अंकुश आणल्यानेच विरोधक एकत्र आले असून अर्थशास्त्र जाणणारे पंतप्रधान आपल्याला लाभल्याचेही नेने म्हणाले.
संमेलनाचे उद्घाटक खा. शरद बनसोडे म्हणाले की, आजच्या नव्या पिढीसमोर सावरकरांचा विचार, त्यांचे कार्य पोहचविण्याची जबाबदारी सावरकर प्रेमींवर आहे. नियोजन समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. यावेळी शंकर गोखले, भाजपचे संघटक रघुनाथ कुलकर्णी, विजय नामजोशी,विनायक देशपांडे, बंडोपत कुलकर्णी, नीता केळकर, दिपक शिंदे आदी उपस्थित होते.
बाळासाहेबांचा मुलगा वेड्यासारखा वागतोय
संमेलनाध्यक्ष नेने म्हणाले की, पुढीलवर्षी निवडणूका होत असून विरोधकांकडून बेसुमार पैशांचा वापर होणार आहे. त्यासाठी डोके ठिकाणावर ठेऊन योग्य माणसाला मत द्या. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा कुणाच्यातरी नादी लागून वेड्यासारखे वागत असून देव त्याला सुबुध्दी देवो असेही ते म्हणाले.