शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोडी लिपी भित्तीपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:09 PM2020-02-17T17:09:14+5:302020-02-17T17:10:31+5:30
सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला. या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला 'शिवस्मरण' असे समर्पक नावही देण्यात आले.
मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षा बिराजदार, वेदिका कुष्ठे, सौ, गिरीजा फडणीस, डॉ. सीमा इंदलकर, ऐश्वर्या डिसले, डॉ. वैशाली कुलकर्णी, प्रियांका कांबळे, ऋजुता देसाई, अस्मिता शेवाळे, सुजाता कुलकर्णी, ऐश्वर्या वैद्य, हर्षदा हंकारे, जान्हवी पुजारी, सोनाली पाटील, श्रीया कोल्हटकर, स्वाती घोडके, स्वप्नाली कुंभोजे विद्यार्थिनींनी हे मोडी लिपीतील लेख लिहीले. भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच.
विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे 'शिवस्मरण' छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले. या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. डॉ. इसी, प्रा. डॉ. नंदिनी काळे, प्रा. डॉ. अनिल सुगते, प्रा. डॉ. भावना मारू, प्रा. वैशाली जोशी, प्रा. डॉ. संदीप दळवी, प्रा. अमृता ठिगळे, प्रा. मृदुला लेले यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते.