मोदी-ठाकरे हे तर बंधूच; पुन्हा एकत्र येऊ शकतात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:43 AM2020-02-22T02:43:26+5:302020-02-22T02:43:44+5:30
चंद्रकांत पाटील यांचे भाष्य
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भावाचेच नाते आहे. आता ते वेगळे झाले असले तरी, नाते तुटलेले नाही. दोन्ही भाऊ केव्हाही एकत्र येऊ शकतात. पण कधी येणार, हे काळच ठरवेल, असे भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे मोदी-ठाकरे भेटीवर केले.
पाटील म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने ठाकरे यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घ्यायला हवी होती, पण शरद पवार, बाळासाहेब थोरात काय म्हणतील म्हणून ते थांबले असावेत. पण आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय असो अथवा नागरिकत्वाचा मुद्दा असो, ते स्पष्ट भूमिका घेत आहेत.
पवारांनी न्यायालयात जावे!
सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. पण मशिदीबाबत ट्रस्टचा उल्लेख केलेला नाही. शरद पवार यांना बाबर सज्जन वाटत असेल तर, त्याच्या मशिदीच्या ट्रस्टसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.