मोदी, शहांना खेड्यांचा विकास दिसतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:56 PM2018-07-15T23:56:54+5:302018-07-15T23:57:21+5:30

Modi, the villagers can not see the development of the villages | मोदी, शहांना खेड्यांचा विकास दिसतच नाही

मोदी, शहांना खेड्यांचा विकास दिसतच नाही

Next


इस्लामपूर/वाळवा : कॉँग्रेसने ६० वर्षांत काय केले? हे विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भारताच्या प्रत्येक खेड्याचा झालेला विकास दिसत नाही का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.
वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्यावतीने आयोजित क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९६ व्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अभयकुमार साळुंखे, कुसुमताई नायकवडी, निमंत्रक वैभव नायकवडी, डॉ. बाबूराव गुरव, शिवाजीराव काळुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे यांनी नागनाथअण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षावेळी ब्रिटिशांचा ससेमीरा चुकविण्यासाठी अण्णा रात्री-अपरात्री देवळात लपून बसत; मात्र त्याचे थोतांड त्यांनी कधी केले नाही, असा चिमटा त्यांनी देव-देवता आणि मंदिरावरून थोतांड माजवणाºया भाजपला काढला.
ते म्हणाले, अण्णा स्वातंत्र्यपूर्व काळात धगधगत्या वाटेवरून चालले; मात्र स्वातंत्र्यानंतरही पुन्हा त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी हीच धगधगती वाट कायम ठेवली. विविध संस्था उभा करून त्यांनी समाजाला समृद्ध केले. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष वृत्तीने समाजकारण केले. त्यांचे कर्तृत्व मोठे असून, हा इतिहास नव्या पिढीसाठी जिवंत ठेवला पाहिजे. अण्णा परिवर्तन चळवळीचे अध्वर्यु होते. उद्याचे परिवर्तन घडविण्यासाठी अण्णांचे विचार जोपासले पाहिजेत.
शेकापचे आ. जयंत पाटील म्हणाले, अण्णांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरोधी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवताना इतिहास रचला. अशा थोर क्रांतिकारकाचा इतिहास पुसण्याचे काम राज्यकर्त्यांकडून सुरू आहे. जे ब्रिटिशांच्या बाजूने लढले, ते आज राज्य करीत आहेत. मला क्रांतिकारकांच्या भूमीत भाजप सत्तास्थाने बळकावत आहे, याची खंत वाटते. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते, त्या काळातही सीमेवर छोट्या-मोठ्या लढाया सुरूच होत्या; मात्र त्याचे त्यांनी कधी राजकीय भांडवल केले नाही.
मात्र आता सीमेवरील जवान आणि तेथील लढाया याचे भांडवल भाजपकडून होत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
कुसूमताई नायकवडी म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जशा फौजी सेना उभ्या केल्या, त्याप्रमाणे अण्णांनी सातारा जिल्ह्यात सशस्त्र फौजा निर्माण केल्या. त्यासाठी आझाद हिंद सेनेतून पंजाबमधील नानकसिंग व मनसासिंग यांना आणले. अण्णांनी आपले जीवन समाजासाठी वाहिले. संस्थात्मक कामाचा लौकिक आशिया खंडात पोहोचला. तो कायम ठेवावा.
यावेळी सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, जि. प.च्या महिला व बालकल्याण समिती सभापती प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, भगवान पाटील, किरण नायकवडी, बाबूराव बोरगावकर, सावकर कदम, वसंत वाझे, नंदिनी नायकवडी, आप्पासाहेब रेडेकर, दीपक पाटील उपस्थित होते. प्रा. राजा माळगी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले.
पाण्याचे स्वप्न पूर्णत्वास : वैभव नायकवडी
वैभव नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, अण्णांनी देशाला स्वतंत्र केल्यानंतर शेतकºयांसाठी दुसºया स्वातंत्र्याची लढाई सुरू केली. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दुष्काळग्रस्तांसह वंचितांच्या हक्कांसाठी लढणाºया चळवळींना बळ दिले. १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांना पाणी देण्याचे अण्णांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. दुष्काळग्रस्तांचे भगीरथ दैवत म्हणून अण्णा आजही त्यांच्या हृदयात आहेत. अण्णा हे सर्व समाजाचे होते. सहकारात हुतात्मा पॅटर्नचा नावलौकिक केला. त्यांचे विचार व चरित्र नव्या पिढीसमोर कायम ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रगतीवादी विचारांची प्रयोगशाळा!
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अण्णांनी राष्टÑभक्तीचा अखंड जागर केला. लोकशिक्षणाचा वसा अखेरपर्यंत जपला. सहकारी हुतात्म्यांच्या बलिदानातून अण्णांचा पुन्हा जन्म झाला. शेतकºयांबद्दलची त्यांची तळमळ मोठी होती. स्वातंत्र्यानंतर अण्णा जिवंत हुतात्मा म्हणून जगले. प्रगतीवादी विचारांची प्रयोगशाळा म्हणून अण्णांकडे पाहायला हवे.

Web Title: Modi, the villagers can not see the development of the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.