Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांचा सात-बारा हडप करण्याचा मोदींचा डाव: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:18 AM2019-04-16T00:18:28+5:302019-04-16T00:18:52+5:30
शिरटे : नरेंद्र मोदी संपूर्ण कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतील, या आशेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मात्र ...
शिरटे : नरेंद्र मोदी संपूर्ण कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतील, या आशेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मात्र शेतकºयांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालून त्यांचा सात-बारा हडप करण्याचा डाव रचला होता, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला.
रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत ते, आपण भाजप-शिवसेना विरोधी भूमिका का घेतली, यामागची पार्श्वभूमी सांगताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, विजय पाटील, बी. डी. पवार, दिलीपराव मोरे, दामाजी मोरे, दादासाहेब मोरे, जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच कुमार कांबळे, नीलेश पवार, सुजीत मोरे, अॅड. विवेकानंद मोरे, जयवंत मोरे, उमेश पवार उपस्थित होते. खा. शेट्टी यांच्या वाळवा तालुक्यातील ताकारी, साखराळे, बहे, कि. म. गड, शिरटे, नरसिंहपूर गावात प्रचार सभा झाल्या.
खा. शेट्टी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी व शेतकºयांना दीडपट हमीभाव देण्याचा विश्वास दिल्याने आम्ही त्यांना साथ केली; मात्र त्यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले खरे रूप दाखविले. प्रथम त्यांनी सुप्रीम कोर्टात असा हमीभाव देता येणार नाही, असे लिहून दिले. त्यानंतर जमीन अधिग्रहण कायद्यात शेतकरीविरोधी भूमिकोचा घाट घातला. अशा विश्वासघातकी मोदी व त्यांच्या पक्षास साथ कशी करायची? मला जायचे होते देवाच्या आळंदीला, मात्र पोहोचलो चोरांच्या आळंदीस! मी तुमच्या भरवशावर त्यांना अंगावर घेतले आहे. मला एकाकी पाडू नका. पुन्हा एकदा त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी मोठ्या मताधिक्याने दिल्लीस पाठवा.
या दौºयात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम पाटील, संजय पाटील, सौ. सुस्मिता जाधव, काँग्रेस पक्षाचे नंदकुमार शेळके, प्रताप मोरे, संदीप जाधव, स्वाभिमानी संघटनेचे सयाजी मोरे, संदीप राजोबा सहभागी होते.