मोहनराव-संग्रामभाऊंमध्ये शाब्दिक खडाजंगी
By admin | Published: July 14, 2017 11:15 PM2017-07-14T23:15:50+5:302017-07-14T23:15:50+5:30
मोहनराव-संग्रामभाऊंमध्ये शाब्दिक खडाजंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत कडेगाव आणि वांगी शाखेच्या स्थलांतरावरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि आमदार मोहनराव कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बँकेच्या शाखेसाठी मुख्य रस्त्यावर जागा हवी असल्याने शाखेचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले; परंतु मोहनराव कदम यांनी शाखा स्थलांतराला विरोध केल्याने दोघांमध्ये कलगीतुरा रंगला. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी मध्यस्थी करीत दोघांमधील वादावर पडदा टाकला.
जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली. मागील काही महिन्यांपासून जिल्हा बँक वसंतदादा कारखाना चालवायला देण्याच्या प्रक्रियेत अडकली होती. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्याचा करार होणे अपेक्षित होते. त्यामुळे बँकेकडील काही नियमित कामे प्रलंबित राहिली आहेत. कार्यकारी समितीमध्ये कर्जाला मंजुरी देण्यासह शाखा स्थलांतराचा विषय आला होता. कडेगाव तालुक्यातील कडेगाव आणि वांगी येथे जिल्हा बँकेची शाखा आहे. कडेगावमध्ये तालुका शाखा करण्याचा उपाध्यक्ष देशमुख यांचा विचार आहे. प्रशस्त आणि चांगली इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी सोसायटीच्या जागेची खरेदी करून त्याठिकाणी प्रशस्त इमारत बांधायची आहे.
वांगी येथे असलेली शाखा दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. बँकेच्या शाखेत जाण्यासाठी वयोवृद्धांसह महिलांना त्रास सहन करावा लागतो. तेथील ग्रामस्थांनी शाखा मुख्य रस्त्यालगत पहिल्या मजल्यावर सुरू करण्याची मागणी केली आहे. वांगी शाखा स्थलांतराचा विषय समितीत मांडण्यात आला. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही शाखा स्थलांतर झाले पाहिजे, असे मत मांडले. त्यामुळे संतप्त झालेल्या मोहनराव कदम यांनी शाखा स्थलांतर करण्याला विरोध दर्शविला. लोकांना बँकेत जाण्यासाठी त्रास होत असेल तर आपण जागा बदलली पाहिजे, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली. मात्र, कदम यांनी शाखेच्या जागेला कोणतीही अडचण नाही आपण जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. शाखांचे कामकाज सुरळीत असताना जागा बदलण्याची गरज नसल्याचे त्यांनी अध्यक्षांना ठणकावून सांगितले. यावर संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रामीण भागात बँकेचे व्यवहार वाढले आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार ग्राहकांना चांगली सुविधा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य चौकात बँकेची शाखा असणे गरजेचे असून, संचालकांनी मानसिकता बदलण्याची विनंती केली.
यातूनच देशमुख आणि कदम गटांतील मतदारसंघातील राजकीय वाद जिल्हा बँकेत उफाळून आला.
संचालकांनी समन्वयाने तोडगा काढावा : दिलीपतात्या
कडेगाव आणि वांगी येथील शाखा स्थलांतरावरून दोन संचालकांत मतभेद आहेत. दोन्ही संचालक एकाच तालुक्यातील असल्याने त्यांनी समन्वय साधून तोडगा काढावा, अशी विनंती केल्याचे बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले.