फलटणला एकवटले मोहिते-पाटील विरोधक

By Admin | Published: July 4, 2017 10:59 PM2017-07-04T22:59:51+5:302017-07-04T22:59:51+5:30

फलटणला एकवटले मोहिते-पाटील विरोधक

Mohathe-Patil opposed to Phaltan | फलटणला एकवटले मोहिते-पाटील विरोधक

फलटणला एकवटले मोहिते-पाटील विरोधक

googlenewsNext


नसीर शिकलगार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पावणे दोन वर्षांचा कालावधी असला तरी माढा लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीतील राष्ट्रवादीचे विरोधक फलटणमध्ये एकवटले आहेत. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते-पाटलांविरोधात तीव्र मोहिम आखण्याबाबत खलबतं करण्यात आली. यावेळी पुढील रणनिती ठरविली असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यानच्या काळात शांत असणारे राष्ट्रवादी अन् मोहिते-पाटील विरोधक फलटणमध्ये माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी एकत्र आले. यावेळी हिंदूराव तसेच रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार आर. जी. रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माळीनगर साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनभाऊ गिरमे उपस्थित होते.
मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये माढा लोकसभा मतदार संघ नव्याने अस्तित्त्वात आला. सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस तर सातारा जिल्ह्यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आले. २००९ मध्ये या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या मोठी होती. तसेच विरोधात लढणारी मोठी नावे आघाडीवर होती.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीला दगाफटका बसू नये म्हणून शरद पवार यांनीच मैदानात उतरुन विजय मिळविला. त्यावेळी विरोधात सध्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, दूग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उभे होते. पवारांनी बेरजेचे राजकारण करत काँग्रेसच्या नेतेमंडळींनाही बरोबर घेतल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळविता आला.
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पवारांनी लोकसभेऐवजी राज्यसभेचा मार्ग स्वीकारल्याने राष्ट्रवादीतर्फे कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे होते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील अनेकजण इच्छुक होते. मात्र, शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. परंतु, मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवरुन सातारा, सोलापूर जिल्ह्यात मोठी नाराजी व्यक्त होत होती.
काँग्रेसने आघाडी धर्म पाळावा म्हणून प्रयत्न होत होते. स्वराज्य उद्योग समुहाचे प्रमुख व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अपक्ष म्हणून उतरविण्याचे डावपेच माणचे आमदार जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आखून मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी शरद पवारांनी लक्ष देऊन राष्ट्रवादीतील नाराज मंडळी व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतेमंडळींना शांत केले होते.
भाजपने स्वाभिमानीला जागा सोडली. स्वाभीमानीने तेव्हा सध्याचे राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला राष्ट्रवादीला एकतर्फी वाटणारी निवडणूक मोहिते-पाटलांवरील नाराजीमुळे चुरशीची झाली. अंतर्गत नाराजीचा फायदा सदाभाऊंना मिळाला.
आघाडीचे नेते वरवर एकत्र दिसत होती तरी कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे मोहिते-पाटील काठावर निवडून आले. माणचे आमदार जयकुमार गोरे वेळेअभावी उपस्थित राहू शकले नसले तरी ते राष्ट्रवादीचे विरोधक असल्याने त्यांची मोहिते-पाटील विरोधी भूमिका राहिली आहे.
भाजप किंवा पुरस्कृत उमेदवार...
रणजितसिंह नाईक-निंबाळकर लोकसभेसाठी इच्छुक असून त्यादृष्टीने रणजितसिंह यांनी विरोधक एकत्र आणण्याची व त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घेतली. भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन चर्चा करण्याचे नियोजन केले. या मतदारसंघातून आतापर्यंत निवडणूक लढलेले सुभाष देशमुख, महादेव जानकर, सदाभाऊ खोत हे मंत्री असल्याने या मतदारसंघातून भाजपतर्फे किंवा भाजप पुरस्कृत उमेदवार उभा करण्याची कल्पना मांडण्यात आली.
सदाभाऊंशी फोनवरून चर्चा
या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबरोबरच सर्वसंमतीने लोकसभेला एकच उमेदवार देण्यावर चर्चा झाली. त्यावेळी निसटता पराभव स्वीकारावा लागलेले सदाभाऊ खोत आता मंत्री असल्याने त्यांच्याशीही दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली.

Web Title: Mohathe-Patil opposed to Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.