सांगलीतील नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांना मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश 

By शरद जाधव | Published: August 30, 2023 08:43 PM2023-08-30T20:43:11+5:302023-08-30T20:44:08+5:30

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले.

Mokka to 13 suspects in Sangli Nalsab Mulla murder case | सांगलीतील नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांना मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश 

सांगलीतील नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांना मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश 

googlenewsNext

सांगली : राष्ट्रवादी काॅग्रेसचा पदाधिकारी आणि बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मुल्ला याच्या खूनप्रकरणातील १३ संशयितांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत कारवाईला मंजूरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले.

मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये टोळी प्रमुख स्वप्नील संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग ता. कवठेमहांकाळ), सनी सुनील कुरणे (२३, जयसिंगपूर जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (२०, लिंबेवाडी, रांजणी ता. कवठेमहांकाळ), सचिन विजय डोंगरे (गुलाब कॉलनी, सांगली), प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण (२३), राेहित अंकुश मंडले (२२,दोघेही खरशिंग) ऋतीक बुध्द माने (२२, कोकळे ता. कवठेमहांकाळ), विक्रम तमान्ना घागरे (२२, रा. ढालगाव ता. कवठेमहांकाळ), प्रविण अशोक बाबर (रा. आलेगाव ता. सांगोला), अक्षय बाळासाहेब शेंडगे (रा. कलानगर, सांगली), अवधुत सुनिल पानबुडे (रा. नळभाग,सांंगली), रोहित बाबासाहेब धेंडे आणि अल्पक राजकुमार कांबळे (दोघेही रा. एरंडोली ता.मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. यातील धेंडे आणि कांबळे हे दोघे अद्यापही पसार आहेत.

१७ जून रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून नालसाब मुल्ला याचा खून करण्यात आला होता. मुल्ला याच्यावरही मोकाअंतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर जामिनावर तो बाहेेर आला होता. या प्रकरणातील संशयित सचिन डोंगरे हाही मोका अंतर्गतच कारागृहात होता. डोंगरेला जामिन मिळवून देण्यास मुल्ला प्रयत्न करत नव्हता या रागातून डोंगरेने कारागृहातूनच सुत्रे हालवत इतर संशयितांकरवी मुल्लाचा खून केला होता. स्वप्नील मलमे व त्याच्या इतर साथीदारांवर खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे यासह इतर गुन्हे दाखल आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या टोळीने हा प्रकार केला होता.

नालसाब मुल्लाच्या खूनाच्या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ तपास करून यातील संशयितांना जेरबंद केले होते. तर मुख्य सुत्रधार सचिन डोंगरे याला कळंबा कारागृहात ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला होता. यानंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काची वाढीव कलमे लावून प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना दिला. अधीक्षक डॉ. तेली यांनी अवलोकन करून मंजूरीसाठी हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना दिल्यानंतर त्यांनी यास मंजूरी दिली आहे.
 

Web Title: Mokka to 13 suspects in Sangli Nalsab Mulla murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.