मिरज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गौस मोमीन टोळीला मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:12 PM2022-11-05T14:12:40+5:302022-11-05T14:13:00+5:30
मोमीन टोळी प्रमुख गौस मोमीन याने वरील सर्व साथीदारांसह मिरजेत गेल्या चार वर्षात टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती.
सांगली : मिरज शहरासह परिसरात गुन्ह्यातून दहशत निर्माण करणाऱ्या गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. या टोळीतील चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली असून, एकजण पसार आहे. संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार आहोत, असा निर्धार पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
मोमीन टोळीचा म्होरक्या गौस उर्फ निहाल गब्बर मोमीन (वय २८, रा. धनगर गल्ली, बुधवार पेठ, सध्या रा. मिरज), समर्थ संजय गायकवाड (वय १८, रा. हाडको कॉलनी, शंभर फुटी, मिरज), जावेद बंडुखान शेख (वय २७, रा. झरी मस्जीद जवळ, मिरज) व एक अल्पवयीन अशा चौघांचा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांत समावेश आहे.
मोमीन टोळी प्रमुख गौस मोमीन याने वरील सर्व साथीदारांसह मिरजेत गेल्या चार वर्षात टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती. मोमीन टोळीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, बनावट नोटा बाजारात आणणे, पिस्तुल बाळगणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्यात केले आहेत. मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी गांधी चाैक पोलिसांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मंजुरी दिली असून मोमीन टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.