एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड, तरुणास दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:25 PM2022-02-05T17:25:43+5:302022-02-05T17:26:57+5:30
सांगली : बुधगाव (ता. मिरज ) येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड करत तिला त्रास देणाऱ्या तरुणास न्यायालयाने दोन ...
सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड करत तिला त्रास देणाऱ्या तरुणास न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चेतन रावसाहेब नांदणीकर (वय २२, रा. वनवासवाडी, बुधगाव) असे आरोपीचे नाव आहे. विशेष अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची माहिती अशी की, सन २०१३-१४ साली बुधगावमध्ये ही घटना घडली होती. फिर्यादी पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबासह बुधगावमध्ये राहण्यास होती. यावेळी दोन अल्पवयीन मुलांशी संगनमत करत आरोपीने मुलीला आपल्याशी प्रेम कर, तुझ्याशी लग्न करावयाचे आहे. लग्न नाही केले तर तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी वारंवार धमकी देत होता. तसेच आरोपी नांदणीकर याने तिचा हात पकडून व रस्त्याने जात-येत असताना तिला हाताने, डोळ्याने अश्लील इशारे तो करत असे.
एकदा अल्पवयीन मुलाकडून त्याने पीडितेच्या घरासमोर चिठ्ठीही टाकली. ही बाब पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर त्याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस. के. कदम यांनी या प्रकरणाचा तपास करून नांदणीकर याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासत ही शिक्षा सुनावली. त्यानुसार दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड करण्यात आला.