इस्लामपुरात आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:21+5:302020-12-08T04:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : तीस वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारणात काहींची मक्तेदारी असल्याचे जाणवते. नवख्याला राजकारणात संपविण्याचे डाव आखले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : तीस वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारणात काहींची मक्तेदारी असल्याचे जाणवते. नवख्याला राजकारणात संपविण्याचे डाव आखले जातात. त्यातून काहीजण कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींनी पालिकेचा नादच सोडला आहे. आगामी निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारी आणि तेच-तेच चेहरे पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.
आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी विकास आघाडीकडे आता खमके नेतृत्व राहिलेले नाही. तरीसुद्धा विकास आघाडीची जुळवाजुळव झाली, तर यामध्ये प्रामुख्याने विक्रम पाटील, विजय कुंभार, वैभव पवार, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, महेश पाटील, सुप्रिया पाटील, चेतन शिंदे, एल. एन. शहा यांच्यासह नगराध्यक्ष निशिकांत पाटील या सर्वांना एकत्रित करण्यात यश येणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
राष्ट्रवादीमध्येही वेगळी परिस्थिती नाही. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर शहरातील राष्ट्रवादीला नेतृत्व नाही. त्यामुळे जयंत पाटील हेच नेतृत्व मानून सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. डॉ. संग्राम पाटील, अॅड. चिमण डांगे, विश्वास डांगे, शहाजी पाटील, संदीप पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, पीरअली पुणेकर, संजय कोरे, दादा पाटील, आनंदराव मलगुंडे, सुनीता सपकाळ, सुभाष सूर्यवंशी, बाबा सूर्यवंशी आदी आजी-माजी नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची अवस्था बिकट आहे. महाआघाडी असल्याने जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सीमा पवार आणि शकील सय्यद यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारीच दिसून येणार आहे.
चौकट
जशास तसे उत्तर
गत निवडणुकीवेळी युतीचे शासन होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यंत्रणेचा वापर करूनच राष्ट्रवादीवर मात केल्याची चर्चा आहे. आता महाआघाडीचे सरकार आहे. आगामी निवडणुकीपर्यंत ते टिकल्यास राष्ट्रवादीकडून यंत्रणेवर दबाव टाकून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोगो- इस्लामपूर पालिका