सांगली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, पूर्व भाग कोरडाच; खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग
By अशोक डोंबाळे | Published: June 24, 2023 05:19 PM2023-06-24T17:19:38+5:302023-06-24T17:19:55+5:30
जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्यांना मान्सूनने अद्याप हुलकावणीच दिली आहे
सांगली : रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृगही कोरडाच जात असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वरूणराजाच्या प्रतीक्षेत होते. खरीप हंगाम लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच शनिवारी आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच सकाळपासून पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मान्सूनची चाहूल तर पूर्व भागातील तालुक्यांना मान्सूनने हुलकावणीच दिल्याचे दिसत आहे.
कोयना, वारणा धरण क्षेत्रांत शनिवारी दमदार पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग निवळले. शिराळा पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. वाळवा, मिरज, पलूस, तासगाव तालुक्यांतील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उन्हाची दाहकता कमी झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत.
शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होताच शनिवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांच्या काही भागात मान्सूनची चाहूल तर पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्यांना मान्सूनने अद्याप हुलकावणीच दिली आहे.