दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मूड यंदा गॅप घेण्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:03+5:302021-03-19T04:25:03+5:30
सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या ...
सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेकडे लिटमस टेस्ट म्हणूनच पाहायचे ठरवल्याचे दिसत आहे. पुरेसा अभ्यास झालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत ड्रॉप घेतला आहे.
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही पूर्णत: संपलेला नाही. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन याची निश्चिती झालेली नाही. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार की मर्यादित अध्यापनावर याचीही स्पष्टता नाही. संपूर्ण वर्ष ऑनलाइन अभ्यास करावा लागला, त्याचा परिणाम गुणवत्तेवरही झाला. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा नाममात्रच द्यायची ठरवली आहे. श्रेणी सुधारचा पर्याय राखून ठेवला आहे. येत्या एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची; पण पुढे ऑक्टोबर आणि त्यानंतरचा मार्च-एप्रिलला पुन्हा परीक्षेला बसायचे. जास्त गुण मिळवायचे, जुने गुणपत्रक बोर्डाकडे जमा करून वाढीव गुणवत्तेच्या गुणपत्रकाच्या आधारे पुढील शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा, असे या विद्यार्थ्यांचे नियोजन आहे.
विशेषत: जेईई, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल गॅप घेण्याकडे आहे. बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल शाखेकडे जाणाऱ्यांना जास्त गुण खुणावताहेत. त्यामुळे यंदाची परीक्षा त्यांच्या दृष्टीने एक प्रकारे चाचणीच आहे. मेरिट मिळाले तर ठीक, अन्यथा हिवाळी किंवा पुढील उन्हाळ्यातील परीक्षेत स्कोअर करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
चौकट
हिवाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी वाढणार
१. यंदा दहावीसाठी सुमारे दोन हजार, तर बारावीसाठी दीड हजार विद्यार्थी पुनर्परीक्षा देत आहेत. अभ्यासक्रम शंभर टक्के न झाल्याने मर्यादित अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा होण्याचे संकेत परीक्षा मंडळाने दिले आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न पुनर्परीक्षार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोना एक प्रकारे लाभदायीच ठरला आहे. पुरेसा अभ्यास झालेला नसतानाही दहावी-बारावीत उत्तीर्ण होण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
२. दहावीनंतर कला, वाणिज्य शाखेत ११ वी करणारे तसेच बारावीनंतर पदवी घेणारे मात्र गॅप घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या दृष्टीने ही कोरोनाची लॉटरीच आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना मेरिटची प्रचंड स्पर्धा असल्याने त्याचे विद्यार्थी मात्र गॅप घेत आहेत. ते परीक्षेला बसतील. मात्र, यंदाची गुणपत्रिका पुढील प्रवेशासाठी वापरणार नाहीत. परीक्षा मंडळाकडे जमा करून पुढील परीक्षेद्वारे जास्त गुणवत्तेची गुणपत्रिका मिळवतील. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी परीक्षेला तसेच पुढील उन्हाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थींची संख्या खूपच असणार, हे स्पष्ट आहे.
दहावीचे परीक्षार्थी
२०२० - ३८४७३
२०२१ - ४०८४४
बारावीचे परीक्षार्थी
२०२० - ३४२६८
२०२१ - ३३०९०