महापालिकेवर आशासेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:36+5:302021-06-16T04:36:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आशासेविकांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आशासेविकांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. दरम्यान, आशासेविकांनी संपाला सुरुवात केली असून, संपात २०० सेविका सहभागी झाल्या आहेत.
आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सिटू इतर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन हाती घेतले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशासेविकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. याचे नेतृत्व काॅ.उमेश देशमुख यांनी केली.
सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून जोखमीची कामे करून घेतली. मात्र, या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्व्हेचे कामही करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटिजन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशासेविकांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेत्या मीना कोळी, सुरेखा जाधव, अंजू नदाफ, दीपाली होरे, शबाना आगा, लता जाधव, अनुपमा गौंड, कॉ.हणमंत कोळी सहभागी झाले होते. किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हा सचिव दिंगबर कांबळे यांनी संपाला पाठिंबा जाहीर केला.
चौकट
मानधनवाढ ठरावाची अंमलबजावणी करा
महापालिकेने आशा सेविकांच्या मानधनवाढीचा ठराव केला आहे, पण याच ठरावात आरसीएच कर्मचाऱ्यांच्या पगारवाढही घुसडला. त्यामुळे आशासेविकांचा मानधनवाढीचा ठराव लटकला आहे. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करून मानधन वाढ द्यावी, अशी मागणीही मोर्चाच्या वेळी करण्यात आली.