देशातील २४ लाखांवर विद्यार्थी देणार उद्या ‘नीट’ची परीक्षा; परीक्षेसाठी असणार ड्रेस कोड
By अविनाश कोळी | Published: May 4, 2024 07:00 PM2024-05-04T19:00:43+5:302024-05-04T19:02:05+5:30
तीन तास अगोदर परीक्षा केंद्रांवर हजेरी
सांगली : वैद्यकीय शाखेच्या प्रवेशाकरिता संपूर्ण देशभरात उद्या, रविवारी ५ मे रोजी ‘नीट’ (युजी)ची परीक्षा होत आहे. यासाठी देशातील ५५७ व परदेशातली १४ केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा होत आहे. देशातील २४ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून यंदा २८ लाखांवर अर्ज दाखल झाले होते. अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळल्यानंतर व दुसऱ्यांना अर्जाची संधी दिल्यानंतर २४ लाखांवर विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
नीटसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या १० लाखांवर, तर मुलींची संख्या १४ लाखांच्या घरात आहे.
देशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएसच्या १,०९,१४५ जागा असून, यावर्षी या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डेन्टलच्या २७ हजार जागा आहेत. एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीटच्या गुणांवरच होत असतात.
चौकटपरीक्षेपूर्वी तीन तास अगोदर हजेरी
परीक्षा दुपारी २ ला सुरू होणार असली, तरी परीक्षा केंद्रावरील रिपोर्टिंगची वेळ सकाळी ११ वाजताची आहे. दुपारी १:३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जातील. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेसाठी ड्रेस कोड
परीक्षेकरिता भडक रंगाचे कपडे, जास्त खिसे असलेले कपडे, फुल बाह्यांचा शर्ट, दागिने, हातात बांगड्या, कडा, गंडा, दोरा, धागे, पायात बूट या वस्तुंना प्रतिबंध आहे. फिकट रंगाचे कपडे, हाफ शर्ट, टी शर्ट, साधी चप्पल किंवा स्लिपर वापरायला परवानगी आहे.
पेन परीक्षा हॉलमध्ये दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी इतर कोणतेही साहित्य घेऊन जाऊ नये. मोबाइल, घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेऱ्यास मनाई आहे. पारदर्शक पाण्याची बाटली बाळगण्यास हरकत नाही. नीट परीक्षेच्या हजेरी पत्रकावर चिकटविण्यासाठी ॲडमीट कार्डवरील फोटोशी तंतोतंत जुळणारा पासपोर्ट आकाराचा फोटो बाळगावा. विद्यार्थ्यांनी तणाव न बाळगता परीक्षा द्यावी. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक, सांगली