शिराळा येथील मोरणा धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:26+5:302021-06-21T04:19:26+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण ...
शिराळा : शिराळा तालुक्यात रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अंत्री, करमजाई, टाकवे या मध्यम प्रकल्पापाठोपाठ मोरणा धरण १०० टक्के भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. रेठरे धरण ५० टक्के भरले आहे.
बुधवारी रात्रीपासून शिराळा शहरासह तालुक्यात सांगाव, मांगले, कोकरूड, शिरशी, आरळा, चरण, वाकुर्डे येथे संततधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे चांदोली धरणासह सर्व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, वारणा, मोरणा नदीमधील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा शहरासह आसपासच्या गावांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नदीच्या पाणी पातळी घट झाली आहे.
पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने पाणी धरणामध्ये येत आहे. शिराळा तालुक्यातील झालेल्या पावसाने मोरणा धरण व अन्य तलावांत चांगला पाणीसाठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाकुरडे, अंत्री, टाकवे लपा तलाव १०० टक्के भरले असून, आज मोरणा मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात सर्वांत अगोदर शिराळा तालुक्यातील तीन तलाव एकाच दिवशी व रविवारी मोरणा धरण भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. उर्वरित तलावही येत्या काही दिवसांत पूर्ण भरतील, त्यामुळे तालुक्यात मार्च २०२२ पर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती इस्लामपूर उपविभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी दिली.