सत्तेच्या राजकारणात सग्यासोयऱ्यांचे गळ्यात गळे, विधानसभेच्या पटावर सगळेच पाहुणेरावळे

By संतोष भिसे | Published: October 26, 2024 06:15 PM2024-10-26T18:15:03+5:302024-10-26T18:16:33+5:30

संतोष भिसे सांगली : ‘ राजकारणात घराणेशाही चालणार नाही’, म्हणणारे नेते निवडणूक येते, तेव्हा मात्र सग्यासोयऱ्यांची सोय कशी होईल, ...

Most of the leaders of Sangli district in the arena of assembly elections were connected with each other through different relationships | सत्तेच्या राजकारणात सग्यासोयऱ्यांचे गळ्यात गळे, विधानसभेच्या पटावर सगळेच पाहुणेरावळे

सत्तेच्या राजकारणात सग्यासोयऱ्यांचे गळ्यात गळे, विधानसभेच्या पटावर सगळेच पाहुणेरावळे

संतोष भिसे

सांगली : ‘राजकारणात घराणेशाही चालणार नाही’, म्हणणारे नेते निवडणूक येते, तेव्हा मात्र सग्यासोयऱ्यांची सोय कशी होईल, यासाठी खटाटोप करीत असतात. सध्याची विधानसभा निवडणूकही पै-पाहुणे आणि गोतावळ्याभोवतीच फिरताना दिसून येते. निवडणुकीच्या रिंगणातील बहुतांश नेते वेगवेगळ्या नातेसंबंधांतून परस्परांशी जोडले गेले आहेत.

‘सामान्य कार्यकर्त्याने आयुष्यभर नेत्याच्या सतरंज्याच उचलायच्या का?’ हा सात्विक संतापाचा प्रश्न वारंवार विचारला जातो. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत नेते मंडळींनी सग्यासोयऱ्यातच सत्तेचे वाटप केल्याचे वारंवार दिसून येते. सध्याच्या विधानसभा निवडणुकीतही पाहुण्यारावळ्यांनीच सत्ताकारणाची सूत्रे हाती घेतल्याचे दिसत आहे.

राजकारणात पै-मेहुणा अन् सगासोय-यांची चलती..

- इस्लामपुरातून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिराळ्यातून भाजपतर्फे रिंगण्यास इच्छुक असलेले सत्यजीत देशमुख हे दोघेही सख्खे साडू आहेत. दोघेही म्हैसाळच्या शिंदे घराण्याचे जावई आहेत. जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा व सत्यजीत यांच्या पत्नी रेणुका सख्ख्या बहिणी आहेत. शिवाय जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हेदेखील राहुरीचे आमदार आहेत.

- सांगलीतून मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या जयश्रीताई पाटील आणि माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे नातेसंबंध आहेत. जयश्रीताई यांची मुलगी मोनिका ही डॉ. जितेश कदम यांच्या पत्नी आहेत. तर जितेश हे डॉ. विश्वजीत कदम यांचे पुतणे आहेत. जयश्रीताईंची आणखी एक ओळख म्हणजे माहेरकडून त्यांची अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी जुनी मैत्री आहे.

- तासगाव -कवठेमहांकाळमधून संजय पाटील यांच्यासाठी किंगमेकरच्या भूमिकेत मैदानात आलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचेही काही राजकारण्यांशी नातेसंबंध आहेत. त्यांची मुलगी ऐश्वर्या यांचा विवाह पाटणच्या विक्रमसिंह पाटणकर यांच्या कुटुंबात झाला आहे. अजितराव स्वत: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भाऊ दिलीपराव देशमुख यांचे सख्खे साडू आहेत. अजितराव यांच्या मेहुणीचा विवाह रामराजे निंबाळकरांच्या कुटुंबात झाला आहे. तर, मेहुणीच्या मुलीचा विवाह पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याशी झाला आहे.

- जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम हे सख्खे मावसभाऊ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही समविचाराने कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहेत. कधीकाळी जिल्हा परिषद सदस्य असणारे विक्रमसिंह सावंत आता दुसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात आहेत.

- सांगलीत कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व साताऱ्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचेही मामा-भाचे स्वरूपाचे निकटचे नातेसंबंध आहेत. शिवाय पृथ्वीराज यांच्या चुलत बहिणीचा विवाह कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कुटुंबात झाला आहे.

Web Title: Most of the leaders of Sangli district in the arena of assembly elections were connected with each other through different relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.