ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:39+5:302021-03-28T04:24:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : स्पर्धा परीक्षेसाठी मुलांनी नियोजनबद्ध अभ्यास करून दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन करावे. योग्य विचारसरणी आणि सकारात्मक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : स्पर्धा परीक्षेसाठी मुलांनी नियोजनबद्ध अभ्यास करून दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन करावे. योग्य विचारसरणी आणि सकारात्मक आत्मविश्वास बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगून शहरीपेक्षा ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत देदीप्यमान यश प्राप्त करू शकतात. कारण संघर्षाचा गुण, कष्ट आणि जिद्द मुलांना या मातीतूनच मिळालेली असते, असे प्रतिपादन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले.
मायणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित 'स्पर्धा परीक्षा-स्वरूप व तयारी' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराव मोकाशी होते. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भूते, महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या प्रमुख डॉ. हेमांगिनी माने उपस्थित होते.
प्रतीक्षा भूते म्हणाल्या, ज्ञान हीच मोठी शक्ती आहे. मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे. विविध चरित्र्यांचाही अभ्यास होणे गरजेचा आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होण्यास मदत होणार आहे. वेळेचे योग्य नियोजन करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचाही सदुपयोग करून घेतला पाहिजे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या प्रमुख डॉ. हेमांगिनी माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यशाळेस मायणी येथील कला, वाणिज्य महाविद्यालय व अग्रणी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे सदस्य प्रा. एस. एस. कांबळे यांनी आभार मानले.