Sangli News: खेळता-खेळता चिमुकला तळ्यात पडला, वाचविण्यासाठी आई धावली; दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:53 AM2023-08-04T11:53:44+5:302023-08-04T11:55:21+5:30
ताडपत्री शेवाळली असल्याने त्या पाण्यातच घसरत राहिल्या
जत : शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलनगरातील आदाटे वस्तीजवळील शेत तळ्यात आई व मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मीनाक्षी चंद्रकांत माने (वय २७) व आलोक चंद्रकांत माने (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. जत पोलिस ठाण्यात याबाबत उशिरा नोंद झाली.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विठ्ठलनगरातील आदाटे वस्तीजवळ माने कुटुंबाचे घर आणि शेती आहे. माने यांच्या घरासमोरच शेततळे आहे. शेततळे सध्या भरले असून त्यातील पाणी शेवाळलेले आहे. दुपारच्या सुमारास तीन वर्षांचा चिमुकला आलोक हा खेळत-खेळत तळ्याकडे गेला. घरात त्याची आई होती. खेळता-खेळता आलोक तळ्यात पडल्याचे लक्षात येताच घरात कोणीही पुरुष माणूस नसल्याने आई मीनाक्षी या त्याला वाचविण्यासाठी धावल्या.
त्या तलावात उतरल्या. मात्र बाहेर पडण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. ताडपत्री शेवाळली असल्याने त्या पाण्यातच घसरत राहिल्या. आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीच मदतीला आले नाही. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी माने यांच्या कुटुंबातील इतर लोक घराकडे आले. मीनाक्षी व आलोक कोठेच दिसले नसल्याने त्यांचा शोध घेताना साडेपाच वाजता मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. जत पोलिसांना याची माहिती दिली. हा प्रकार समजताच नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणले.