हरोलीत सावत्र मुलाकडून आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:42+5:302021-04-02T04:26:42+5:30
मृत महिलेचा फोटो येणार आहे. कवठेमहांकाळ : हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतजमीन व आर्थिक वादातून सावत्र मुलाने आईचा कुऱ्हाडीने ...
मृत महिलेचा फोटो येणार आहे.
कवठेमहांकाळ : हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतजमीन व आर्थिक वादातून सावत्र मुलाने आईचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. नंदा संभाजी सुर्वे (वय ५०, रा. हरोली) असे मृत महिलेचे; तर अमोल संभाजी सुर्वे (वय ३०) असे संशयित मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवार, दि. ३१ मार्चरोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. संशयितास कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संभाजी बाबू सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे.
नंदा सुर्वे अमोलच्या सावत्र आई असून, त्या अमोल व घरच्यांना आपल्या खात्यावर दोन लाख रुपये टाकण्यास वारंवार सांगत होत्या. यावरून अनेकवेळा दोघात भांडण झाले होते. बुधवारी सायंकाळी शेतातील काम करून नंदा घरात झोपल्या होत्या. साडेसहा वाजता झोपून उठल्यावर अमोल व त्यांच्यात पुन्हा दोन लाख रुपयांवरून भांडण सुरू झाले. त्यात टोकाची वादावादी झाली. यावेळी चिडलेल्या अमोलने आईच्या डोक्यात, मानेवर, कानावर, तोंडावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. हे वार वर्मी बसल्याने नंदा सुर्वे जागीच ठार झाल्या. त्यांच्या उजव्या हाताची बोटेही अमोलने तोडली.
घटनेनंतर कुटुंबियांनी जखमी अवस्थेत नंदा यांना कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी कुटुंबियांसोबत अमोलही तेथेच होता. यामुळे त्याला सांगली येथूनच पोलिसांनी ताब्यात घेतले.
रात्री घटनास्थळी जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सहाणे यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, दादासाहेब ठोंबरे करत आहेत.