आईच्या उत्तरकार्यावेळी पुस्तके भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:17 PM2018-08-02T23:17:34+5:302018-08-02T23:17:37+5:30
सुनील चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील अशोक कृष्णात पाटील यांनी स्वत:च्या आईच्या उत्तरकार्यावेळी १० हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचनालयास दिली.
तांदुळवाडी येथील श्रीमती इंदुबाई कृष्णात पाटील यांचे दि. २० जुलैरोजी निधन झाले. आर्थिक परिस्थिती एकदमच बेताची असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात कोणीच जास्त शिकू शकले नाही. इंदुबाई यांचा मुलगा अशोक यांची शिक्षण घ्यायची जिद्द होती. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनाही शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे ते नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना मदत करत आले आहेत. जे शिक्षण आपल्याला घेता आले नाही, ते समाजातील गोरगरीब, गरजू मुलांना मिळावे या हेतूने त्यांनी आई इंदूबाई पाटील यांच्या उत्तरकार्याच्या कार्यक्रमावेळी विवेक ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. डी. आर. कुलकर्णी यांच्याकडे १० हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके सुपूर्द केली.
या कार्यक्रमावेळी सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अर्जुन पाटील, लालासाहेब पाटील, माणिक पाटील-चुयेकर, बाळकृष्ण तोडकर, शशिकांत जाधव, महादेव पाटील, सुनील पाटील, नामदेव सावंत, डॉ. गौरी कुलकर्णी उपस्थित होते. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक मानले.
मुलांनाही चांगले शिक्षण
अशोक पाटील यांनी तीनही मुलांना उच्चविद्याविभूषित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. थोरला मुलगा कोल्हापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे; तर धाकट्या दोन मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, ते आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची तयारी करत आहेत. गोरगरीब मुलांनाही स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी पाटील यांनी पुस्तके भेट दिली.