शेटफळेतील ध्येयदिशा प्रतिष्ठानमुळे युवकांना प्रेरणा, युवा पिढीला बलशाली बनविण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 12:17 PM2022-01-01T12:17:12+5:302022-01-01T12:21:30+5:30
गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठान युवकांच्या मनातील प्रेरक विचाराला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे.
लक्ष्मण सरगर
आटपाडी : सध्या स्पर्धेच्या युगात युवकांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठानची उभारणी अधिक जोमाने होत असून, युवा पिढीला बलशाली बनविण्याचे कार्य सुरू आहे.
थोर साहित्यिक आधुनिक वाल्मीकी ग. दि माडगूळकर यांची जन्मभूमी शेटफळे येथील साहित्यिक प्रा. संभाजी गायकवाड यांच्या प्रेरणेतून या प्रतिष्ठानची स्थापना आली असून, मायणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान कार्यरत आहे.
विद्यार्थी दशेपासून ते किशोरवयापर्यंत युवकांच्या मनामध्ये हाेत असणाऱ्या बदलांसह वैचारिक, भावनिक, शारीरिक बदलांना सामोरे जात असताना होणारे मानसिक बदल, याचबरोबर युवकांच्या मनामध्ये करिअरबाबत असणारी अस्वस्थता याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेटफळेतील प्रा. संभाजी गायकवाड यांनी २०१९ पासून ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठानची स्थापन केली. प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्स ॲप ग्रुप सुरू करून युवक, युवतीसह त्याच्या पालकांना ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेतले. त्यांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांचा विविध क्षेत्रांत असणारा कल जाणून घेऊन तयारीबाबत मार्गदर्शन केले जाते. विविध क्षेत्रांतील यशस्वी शेतकरी, उद्योजक, व्यवसायिक, गृहिणी, विद्यार्थी, नोकरदारांना आमंत्रित करून त्याच्या व्याख्यानाचे आयोजन वर्षभर करण्यात येत येते. निरनिराळ्या क्षेत्रातील यशस्वीतांचे अनुभव ऐकायला मिळाल्याने युवकांच्या मनात जिद्द निर्माण होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठान युवकांच्या मनातील प्रेरक विचाराला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे. प्रा. संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून शेटफळे गावासह अन्य तालुक्यातील युवकांसाठी प्रतिष्ठानचे कार्य सुरू आहे.