अपघातात मोटार जळाली; तरुणाचा होरपळून मृत्यू, घरी फोन करुन म्हणाला होता..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:52 PM2022-10-07T13:52:30+5:302022-10-07T13:53:02+5:30
फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे.
पलूस : शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडी जळून खाक झाली; तर मकबूल गौसलाजम पटेल (वय २५, रा. बलवडी (भा), ता. खानापूर) याचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा झालली ही घटना पहाटेच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यवसाय असलेला मकबूल हा तरुण नेहमी कामानिमित्ताने बाहेर असे. अपघाताच्या दिवशीही त्याने घरी यायला रात्री उशीर होईल असे फोन करून कुटुंबीयांना सांगितले होते. मंगळवार दि. ४ रोजी रात्री उशिरा तो बलवडी येथे घरी त्याची चारचाकी गाडी (एमएच १० डी क्यू ७१४२) ने जात असताना पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याच्या जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला.
अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली, मकबूल यांच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी पेटलेली गाडी पाहून टोल फ्री नंबर वरती फोन करून पोलिसांना माहिती दिली. पलूस पोलिसांनी घटना स्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मकबूल याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे.