जुन्या पेन्शनसाठी सांगलीत शासकीय कर्मचारी, शिक्षकांची मोटारसायकल रॅली; ..अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा
By अशोक डोंबाळे | Published: September 21, 2022 12:15 PM2022-09-21T12:15:33+5:302022-09-21T12:16:24+5:30
...अन्यथा बेमुदत संपावर जाणार
सांगली : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज, बुधवारी मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सांगलीतील स्टेशन चौकातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभेन झाली.
आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय सचिव पी. एन. काळे, जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, शरद पाटील, राजेंद्र कांबळे, दिलीप पाटील, गणेश धुमाळ, शीतल ढबू, प्रदीप पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद, अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या १७ वर्षांपासून सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. परंतु या मागणीची दखल राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. राज्यस्थान, छत्तीसगड व झारखंड या राज्यांतील २००५ नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अन्यथा राज्यातील १७ लाख कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहेत. म्हणूनच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी मोटारसायकल रॅलीचे काढण्यात आली आहे.
...अन्यथा बेमुदत संपावर जाणार
जुन्या पेन्शनसाठी अनेक आंदोलन झाली आहेत. तरीही राज्य सरकार दखल घेत नाही. म्हणूनच राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी बेमुदत संपावरही जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन सामाजिक सुरक्षा म्हणून तो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, त्या हक्कासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत, असेही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष पी. एन. काळे म्हणाले.