Sangli: आष्टा पोलिसांनी लावला दुचाकी चोरीचा छडा, सुमारे साडे सात लाखांच्या १७ गाड्या केल्या हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:01 PM2023-08-12T17:01:14+5:302023-08-12T17:02:16+5:30
सुरेंद्र शिराळकर आष्टा : आष्ट्यासह यवत, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेलेल्या सात लाख ६३ ...
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्ट्यासह यवत, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेलेल्या सात लाख ६३ हजारांच्या १७ मोटारसायकली हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मनीषा कदम यांनी दिली.
याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय अण्णाप्पा भानुसे (वय ४५, रा. आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर) यांची मोटारसायकल ३० जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांच्यासह पोलिस हवालदार सुरेश भोसले, सुधीर साळुंखे, अरविंद संकपाळ, रूपाली पाटील, सूरज थोरात (सर्व आष्टा पोलिस ठाणे), अमरसिंह सूर्यवंशी (तासगाव पोलिस ठाणे) व सांगली सायबर पोलिस कॅप्टनसाहेब गुंडवाडे हे अज्ञात चोरट्याचा तपास करीत होते.
सुरेश भोसले व सूरज थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आष्टा येथील मुंबई तलावाजवळ एक मोटारसायकलस्वार संशयितरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव नामदेव बबन चुनाडे (वय ५०, रा. अनिलनगर, पंढरपूर, जि. सोलापूर) असे सांगितले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आष्टा येथील दोन मोटारसायकलीसह इतर पंधरा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी त्याचे मित्र महादेव भारत भोसले (वय २५), भारत भोसले (रा. लक्ष्मीनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ७ लाख ६३ हजारांच्या सर्व १७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. याबाबत आष्टा पोलिसांचे कौतुक होत असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब बाबर करीत आहेत.