१७ लाख ६० हजार नागरिकांना लस टोचण्याचे डोंगराएवढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:48+5:302021-04-21T04:26:48+5:30

सांगली : केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार ...

A mountain-like challenge to vaccinate 17 lakh 60 thousand citizens | १७ लाख ६० हजार नागरिकांना लस टोचण्याचे डोंगराएवढे आव्हान

१७ लाख ६० हजार नागरिकांना लस टोचण्याचे डोंगराएवढे आव्हान

Next

सांगली : केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात सुमारे १७ लाख ६० हजार नागरिकांना लस देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या १८ ते ४५ वर्षांच्या लाभार्थींना लस देताना लस टंचाईचा मोठा अडथळा येत आहे, या स्थितीत साडेसतरा लाख लोकांना लस देण्याचे शिवधनुष्य कसे पेलणार, हा मोठा प्रश्न आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ आहे. गेल्या दहा वर्षांत ३२ लाखांवर गेली आहे. १८ वर्षांवरील नागरिक २३ लाख ९० हजार ५३७ आहेत. त्यापैकी ६ लाख ३० हजार नागरिक ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. उर्वरित १७ लाख ६० हजार हजार नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रचंड यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्ह्यात आजअखेर सुमारे ४ लाख १९ हजार ९७८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. ३७७ केंद्रांवर सुमारे २ हजार ३०० वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. दररोज सरासरी १९ ते २० हजार लसीकरण होत आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. ४ लाख २० हजार नागरिकांच्या लसीकरणासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. आता साडेसतरा लाख नागरिकांना लस देण्यासाठी प्रचंड यंत्रणा उभी करावी लागेल.

बॉक्स

लस पुरता पुरेना!

- सध्या जिल्ह्याचे लसीकरण अतिशय कसरत करीत सुरू आहे. दररोजचे सरासरी लसीकरण १८ ते २० हजार आहे; पण मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही.

- एक दिवसाआड २५ ते ३० हजार डोस मिळत आहेत. अवघ्या दीड-दोन दिवसात लस संपूनही जाते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस लसीकरण बंद राहत आहे. दररोज वीस हजार डोस मिळाले तरच लसीकरण सुरळीत राहणार आहे.

बॉक्स

४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे ६६ टक्के लसीकरण

- जिल्ह्यातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६ लाख ३० हजार लाभार्थींपैकी ४ लाख १९ हजार ९७८ जणांचे लसीकरण सोमवारअखेर पूर्ण झाले. हे प्रमाण ६६ टक्के आहे.

- ३ लाख ९० हजार ७७३ जणांना पहिला डोस, तर २९ हजार २०५ जणांना दुसरा डोस दिला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू होणार असल्याने ही मोहीम अक्षरश: युद्धस्तरावर राबवावी लागेल.

बॉक्स

ज्येष्ठांची कामगिरी अव्वल

- ६० वर्षांवरील १ लाख ९३ हजार ५८७ ज्येष्ठांनी आजवर लस टोचून घेतली आहे. पहिला डोस १ लाख ८७ हजार १५६ जणांनी, तर दुसरा डोस ६ हजार ४३१ जणांनी घेतला आहे.

- लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ४५ ते ५९ वर्षांच्या १ लाख ५७ हजार १०९ जणांनी लस घेतली आहे, त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ३०

हजारांनी पुढे आहेत.

बॉक्स

दुसऱ्या डोसमुळे गर्दी वाढणार

- जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. दुसरा डोस १४ फेब्रुवारीपासून सुरू झाला.

- आजवर २९ हजार २०५ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. सर्वसामान्यांसाठी दुसरा डोस आठवडाभरापूर्वी सुरू झाल्याने गर्दी वाढली आहे. परिणामी लसीचा साठा दोन दिवसांतच संपत आहे.

- लसीकरण अखंड सुरू राहण्यासाठी दररोज २० हजार डोस अपेक्षित आहेत, मात्र अपेक्षित पुरवठा होत नाही.

- लस संपताच नव्या पुरवठ्याकडे डोळे लाऊन बसावे लागते. ती आल्यानंतर वेगाने वितरण करून लसीकरणाची चेन ब्रेक होणार नाही याची काळजी घेतली जाते.

बॉक्स

लसीकरण केंद्रे वाढवावी लागणार

जिल्ह्यात सध्या ३७७ केंद्रांवर लसीकरण केले जाते. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व खासगी कोविड रुग्णालयांचाही समावेश आहे. १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू होईल तेव्हा केंद्रे वाढवावी लागतील. पोलिओ लसीकरणाप्रमाणे मोहीम हाती घ्यावी लागेल. सर्वच खासगी रुग्णालयांत सोय करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा लागेल. प्रचंड लसीच्या साठ्यासाठीही पुरेशी व्यवस्था करावी लागेल.

पॉइंटर्स

- जिल्ह्याची लोकसंख्या - सुमारे ३२,००,०००

- १८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या - १७,६०,५३७

- स्त्री - ८,५०,०६७

- पुरुष - ९,१०,४००

Web Title: A mountain-like challenge to vaccinate 17 lakh 60 thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.