संभाजी पवार यांच्या निधनाने मिरज पश्चिम भागावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:25+5:302021-03-17T04:27:25+5:30
कसबे डिग्रज : माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी (दि. १४) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने मिरज पश्चिम भागावर ...
कसबे डिग्रज : माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी (दि. १४) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने मिरज पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे. पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मिरज पश्चिम भागाचे त्यांनी तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते.
वसंतदादा घराण्याचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी पवार यांना या भागातील जनतेने भरभरून मतदान देत तीन वेळा आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांना सांगली मतदारसंघातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग, हरिपूर, कर्नाळ, आदी गावांतून मोठी साथ मिळाली हाेती. आमदारकीच्या काळामध्ये संभाजी पवार यांनी रस्ते, गटरी, वीज व पाणी यांसारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांना नेहमीच प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे वसंतदादा कारखान्यावर ऊसदर आंदोलन व झोनबंदी या महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रश्नांसाठी या भागांमध्ये नेहमीच आग्रही भूमिका ठेवली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभाजी पवार यांच्याविषयी एक आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. या मतदारसंघातील मिरज पश्चिम भागातील काही गावांमध्ये संभाजी पवार यांना मानणारा फार मोठा गट अद्यापही कार्यरत आहे. या भागातील जनतेचे अनेक प्रश्न अप्पांनी मारुती चौकामध्ये बसून सोडविलेले आहेत. त्यामुळे पैलवान संभाजी पवार यांच्या निधनाने मिरज पश्चिम भागावर फार मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध गावांमध्ये ग्रामपंचायत, सोसायटी, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, मंडळांतर्फे आदरांजली वाहून व्यवहार बंद ठेवण्यात आले.