म्हैसाळमध्ये मूक मोर्चा

By admin | Published: March 8, 2017 11:36 PM2017-03-08T23:36:41+5:302017-03-08T23:36:41+5:30

महिलांचा मोठा सहभाग : खिद्रापुरेवर कारवाईची मागणी

Mouth Front in Mhasal | म्हैसाळमध्ये मूक मोर्चा

म्हैसाळमध्ये मूक मोर्चा

Next



म्हैसाळ : बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी दोषी आढळलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महिलांनी मूक मोर्चा काढला.
म्हैसाळ ग्रामपंचायतीपासून या मोर्चास सुरुवात झाली. ग्रामपंचायत, पीरकट्टा, जैन मंदिर, आबासाहेब शिंदे चौक या प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी तहसीलदार व जिल्हा पोलिस उपप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये म्हैसाळच्या सरपंच मनोरमादेवी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गिरीजादेवी शिंदे, मिरज पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयश्री कसुरे, दुर्गादेवी शिंदे, पद्मश्री पाटील, कुंदन पाटील, सुनंदा पाटील, नंदाताई कोळेकर, तेजश्री चिंचकर, राणी देवकारे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)
महिलादिनी आंदोलनाची वेळ
आठ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे. एकीकडे महिलांच्या विशेष कामगिरीसाठी महाराष्ट्रभर वेगवेगळे सत्कार समारंभ होत आहेत. याविरोधात म्हैसाळमधील महिलांना स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मूक मोर्चा काढावा लागत असल्याची खंत अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केली. स्वातीचा गर्भपात करण्यासाठी विरोध असतानाही केवळ मुलगा हवा म्हणून तिचा पती प्रवीण जमदाडे याने तिला गर्भपातासाठी प्रवृत्त केले. स्वातीच्या पतीसह सासू, सासरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी महिलांनी केली. कळी उमलून तिचे फूूल बनण्याआधी प्रवीणने ती खोडून काढली. या प्रकरणात फक्त डॉक्टर व प्रवीणलाच दोषी धरून चालणार नाही, तर सासरच्या लोकांना व शासकीय यंत्रणेसही दोषी धरायला हवे, अशी प्रतिक्रिया उमटत होती.

Web Title: Mouth Front in Mhasal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.