मिरजेतील वॉन्लेस रुग्णालय वेल्लोरऐवजी कऱ्हाडला देण्याच्या हालचाली, कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध
By संतोष भिसे | Published: October 31, 2023 04:48 PM2023-10-31T16:48:51+5:302023-10-31T16:49:12+5:30
ख्रिस्ती मिशनरी सर विल्यम वाॅन्लेस यांनी १२५ वर्षांपूर्वी मिरजेत स्थापन केलेले रुग्णालय सध्या आर्थिक अडचणीत
मिरज : येथील दोन वर्षांपासून बंद असलेल्या वाॅन्लेस रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी निदर्शने केली. रुग्णालय वेल्लोरशिवाय अन्य खासगी वैद्यकीय महाविद्यालयास चालविण्यासाठी देण्यास विरोध केला.
ख्रिस्ती मिशनरी सर विल्यम वाॅन्लेस यांनी १२५ वर्षांपूर्वी मिरजेत स्थापन केलेले रुग्णालय सध्या आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह सुमारे ४० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. गेली दोन वर्षे रुग्णालय बंद आहे. ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. ते मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बंद रुग्णालय वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज या ख्रिस्ती संस्थेस चालविण्यास देण्याबाबत बोलणी सुरू आहे. वेल्लोर येथील संस्थेच्या शिष्टमंडळाने मिरजेत येऊन पाहणीही केली आहे. हस्तांतराविषयी अनेक बैठकाही झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
यादरम्यान, अचानक वेल्लोरऐवजी कऱ्हाड येथील खासगी संस्थेला रुग्णालय चालविण्यास दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. वेल्लोरऐवजी इतर कोणत्याही संस्थेस देण्यास विरोध केला आहे. रुग्णालयाच्या आवारात एकत्र येत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. वेल्लोरशिवाय अन्य संस्थेकडे रुग्णालय सोपविण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. सव्वाशे वर्षांची ख्रिस्ती संस्था स्थानिक राजकारण्यांच्या घशात घालण्यास विरोध असल्याचे सांगितले.