अवैध धंद्यांविरोधात आंदोलन
By admin | Published: January 22, 2016 12:16 AM2016-01-22T00:16:25+5:302016-01-22T00:51:01+5:30
सुप्रिया सुळे : तासगावात कार्यकर्त्यांशी संवाद
तासगाव : आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अवैध धंदे बंद होते. मात्र भाजप सरकारच्या काळात दारू, मटका यांसारखे अवैध धंदे राज्यभर फोफावले आहेत. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. गुरुवारी तासगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ‘कॉफी वुईथ खासदार सुप्रिया सुळे’ असा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील, उपसभापती अशोक घाईल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, आर. आर. आबांनी राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आघाडी सरकारच्या काळात राज्यात कोठेच अवैध धंदे सुरु नव्हते. मात्र या सरकारच्या काळात राज्यात सर्वत्र अवैध धंदे जोरात सुरु आहेत.
आमदार सुमनताई पाटील यांनीही, अशा धंद्यांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करून, धंदे बंद झाले नाहीत, तर त्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आबांनी मतदानाद्वारे दारुबंदीचा निर्णय घेतला. त्यांच्या काळातच देशात महाराष्ट्राच्या पोलीस दलात सर्वाधिक महिलांची भरती केली. आताच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सरकारने चुकीचे काम असेल तर सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही सुळे यांनी दिला. (वार्ताहर)
स्मिताने राज्याची जबाबदारी घ्यावी
कर्तृत्ववान बापाची कर्तृत्ववान मुलगी, अशी स्मिता पाटील यांची ओळख आहे. राज्यात महिला, मुलींच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे स्मितानेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी यावेळी केले.
सप्टेंबरपर्यंत गोडच बोला
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, तिळगूळ घ्या आणि सप्टेंबरपर्यंत निवडणुका नसल्यामुळे सर्वांशी गोडच बोला, असे त्यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये नगरपालिकेची निवडणूक असल्याने त्याबाबतचा सूचक इशाराच खासदार सुळे यांनी दिला.