इस्लामपुरात ‘स्वीकृत’च्या हालचाली
By Admin | Published: December 29, 2016 11:12 PM2016-12-29T23:12:19+5:302016-12-29T23:12:19+5:30
राष्ट्रवादीत शांतता : आघाडीत दबावतंत्र; नगरसेवक अज्ञातस्थळी
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
इस्लामपूर पालिकेतील राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी गेले असून स्वीकृत नगरसेवक पदासाठी सध्या तरी राष्ट्रवादीत शांतता आहे. सत्ताधारी विकास आघाडीमध्ये विक्रम पाटील आणि शिवसेनेचे आनंदराव पवार नेते आहेत. पवार उपनगराध्यक्ष होण्याच्या तयारीला लागले आहेत, तर ‘स्वीकृत’साठी एल. एन. शहा, सतीश महाडिक, सनी खराडे यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे.
उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी बुधवार, दि. ४ जानेवारीरोजी होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आणि अपक्ष दादा पाटील अज्ञातस्थळी गेले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून संजय कोरे यांची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत उपनगराध्यक्षपद आणि सभापतीपदे राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी स्वत: माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे.
दुसरीकडे मात्र विकास आघाडीत गटनेते विक्रमभाऊ पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. त्यातच स्वीकृत नगरसेवक घेण्यासाठी विकास आघाडीला एक आणि राष्ट्रवादीला दोन, अशी संधी मिळणार आहे.
निवडणुकीपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एल. एन. शहा, सतीश महाडिक व सनी खराडे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आता या तिघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.
सत्ताधारी विकास आघाडीला आव्हान देण्यासाठी सभागृहात अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक असावा, यासाठी राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्या नावांचा विचार सुरू आहे. परंतु राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी आहे.