सक्तीने शैक्षणिक शुल्क घेतल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:57+5:302021-07-19T04:17:57+5:30
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवती संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जुबेर खाटीक, ...
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवती संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जुबेर खाटीक, प्रियांका साळुंखे, अमित मगदूम, विक्रम पवार, सागर जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या संकटाने कॉलेज बंद आहेत. मग परीक्षेचे अर्ज भरताना जिमखाना, ग्रंथालय, स्नेहसंमेलन, आदी फीची सक्ती कशासाठी? प्रशासनाने लक्ष घालून हा प्रकार बंद करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसची इस्लामपूर शहर विद्यार्थी संघटना व युवती संघटना तीव्र आंदोलन करील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष जुबेर खाटीक, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांनी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन दिले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे अमित मगदूम, विक्रम पवार, सागर जाधव, कार्तिक कदम, राज मुल्ला, सुप्रिया पेठकर, अनिता जाधव उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचा व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. सध्या परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व फी भरण्याची सक्ती महाविद्यालये करीत आहेत. प्रशासनाने लक्ष घालून तत्काळ हा प्रकार थांबवावा; अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.