इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा ‘एकास एक’साठी हालचाली
By Admin | Published: October 1, 2014 10:53 PM2014-10-01T22:53:05+5:302014-10-02T00:14:11+5:30
विधानसभा मतदारसंघ : अभिजित पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय होणार, राजकीय घडामोडींना आला वेग
इस्लामपूर : जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी दोन आजी-माजी खासदारांनी प्रयत्न केले होते. परंतु पक्षीय निर्णयामुळे त्याला खो बसला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या रिंगणात जे-जे उमेदवार उतरले आहेत, त्यांच्याकडून पाठिंबा मिळवून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेचे उमेदवार भीमराव माने यांचा पाठिंबा मिळवण्यात अभिजित पाटील यशस्वी झाले असून, त्यांना ताकद देण्यासाठीच नानासाहेब महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे समजते.
अर्ज माघारीनंतर जयंत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे जितेंद्र पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर उमेदवार बी. जी. पाटील, शेतकरी संघटनेचे विलास रकटे यांच्यासह उर्वरित विरोधी उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांना सोबत घेऊन त्यांनी मतदारसंघाचा संपर्क दौरा केला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची साथ घेऊन महायुतीतील घटक पक्षांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु राज्यातील आघाडी व युती फाटल्याने उमेदवारीचे सर्व पर्याय खुले झाले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील हालचाली थंडावल्या होत्या. अर्ज माघारीनंतर आता पुन्हा एकदा एकच उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवटच्या क्षणी पुरस्कृत केलेल्या अभिजित पाटील यांना ताकद देण्यासाठी जयंत पाटीलविरोधातील सर्व उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अभिजित पाटील यांना मदत करण्यासाठीच महाडिक यांनी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)
स्वाभिमानीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा
आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनी भ्रमणध्वनीवरून शिवसेनेची उमेदवारी मागे घेण्याची सूचना आपल्याला दिली. त्यामुळे आपण निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून, स्वाभिमानीचे पुरस्कृत उमेदवार अभिजित पाटील यांना पाठिंबा दिल्याचे भीमराव माने यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले. याच बैठकीत वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनीही पाटील यांना पाठिंबा दिल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे, पं. स. सदस्य प्रकाश पाटील उपस्थित होते.