साखर सम्राटांपुढे चळवळ गारद-- शेट्टी-खोत यांच्या भूमिकेने ऊस उत्पादकांत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:26 PM2017-09-19T23:26:30+5:302017-09-19T23:26:35+5:30
इस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे.
अशोक पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडून शेतकरी चळवळीशी आपली नाळ पुन्हा भक्कम केली आहे. शेतकरी चळवळीतून खासदार शेट्टी यांची हवा काढून टाकण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पर्यायी संघटना उभी करत आहेत. मात्र या दोघांच्या भूमिकेबद्दल ऊस उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याचाच फायदा आता साखरसम्राटांनी उठविला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत या सम्राटांनी बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे.
शेट्टी—खोत यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यासह राज्यात ऊस उत्पादकांची मोळी बांधून साखर सम्राटांना पुरते आव्हान दिले होते. त्यांचे विरोधक म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांचे नेते जयंत पाटील यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. संघटना फोडण्यासाठी जयंतनीतीचा वापरही करण्यात आला. परंतु याचा कसलाही परिणाम झाला नाही.
शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शेट्टी हे महाआघाडीत सामील झाले. त्यातच भाजपने सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद देऊन शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु मंत्रीपद मिळाल्यानंतर खोत हे शेतकºयांपासून दुरावून भाजपमय झाले. त्यांच्याकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. येथूनच खोत आणि शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी पडली.
घराणेशाहीच्या मुद्यावर भाषणबाजी करणाºया मंत्री खोत यांनी, मध्यंतरी झालेल्या जि. प. निवडणुकीत चिरंजीव सागर खोत यांना उमेदवारी दिली. त्यामुळेही खा. शेट्टी चांगलेच नाराज झाले. या वादात दोघांनीही शेतकºयांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे शेतकºयांना शासनाने ठरवून दिलेली एफ.आर.पी. तर सोडाच, पहिला हप्ता देण्यासही विलंब लावला.
या दोघांमध्ये सुरु असलेल्या वादाचा फायदा साखर सम्राटांनी उठविला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णयही काही साखर सम्राटांनी घेतला आहे. त्यांच्या ताकदीपुढे आता शेतकरी चळवळ गारद झाली आहे. याचा फटका मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन होणाºया संघटनेलाही बसणार आहे, हे मात्र निश्चित.
शेतकरी दुरावू लागले
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी सक्षम कारखान्यांनी शासनाच्या एफ.आर.पी.पेक्षाही जादा दर देऊन ऊस उत्पादकांना खूष केले आहे, तर काही कारखान्यांनी पहिले बिल काढतानाही मोठा विलंब लावला. वास्तविक पाहता ऊस दराच्या आंदोलनासाठी प्रसिध्द असलेल्या शेट्टी—खोत यांच्या संघटनेने यावेळी आंदोलन करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ऊस दर मिळालेले आणि न मिळालेले शेतकरीही आता संघटनेपासून दुरावले आहेत.
ऊस उत्पादकांच्या ताकदीवर शेट्टी—खोत यांनी स्वत:चा स्वार्थ साधून घेतला. आंदोलनाच्यारूपाने ताकद दाखवून, साखर सम्राटांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन तोडी करण्याचा उद्योगच सुरु केला आहे. यातूनच या दोघांमध्ये संघर्ष उफाळला आहे. आता शेट्टी—खोत यांनी शेतकºयांबद्दल कितीही कळवळा दाखवला तरी, बळीराजा त्यांना माफ करणार नाही.
विश्वासराव पाटील,
माजी उपाध्यक्ष, राजारामबापू सह. साखर कारखाना.