सांगलीत पोलिसांचे संचलन
By admin | Published: October 12, 2014 12:50 AM2014-10-12T00:50:16+5:302014-10-12T00:53:40+5:30
निवडणुकीची तयारी : जिल्ह्यात २४ तास नाकाबंदी
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे तीन दिवस राहिल्याने पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे. शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातून संचलन केले. येत्या एक-दोन दिवसात बंदोबस्ताचे वाटप केले जाणार आहे. शुक्रवारपासून जिल्ह्याभर २४ तास नाकाबंदी लावण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी १५ आॅक्टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ३८८ मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी सायंकाळी बंदोबस्ताचा आढावा घेतला. जिल्ह्यातील पोलिसांची कुमक कमी असल्याने बाहेरील राज्यातून बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांनीच शहरातून संचलन केले. पुष्पराज चौकातून संचलनास सुरुवात झाली. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, धनंजय भांगे, राजू मोरे यांच्यासह चारशेहून अधिक पोलीस संचलनात सहभागी झाले होते. ढोल वाजवित संचलन करण्यात आले. राममंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर, स्टेशन चौक, राजवाडा चौक, शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक, आंबेडकर रोड या प्रमुख मार्गावरुन संचलन झाले. जिल्हाभर उद्या (रविवार) पासून संचलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)