सांगलीत ठिय्या आंदोलनास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:40 PM2018-08-07T23:40:42+5:302018-08-07T23:40:46+5:30
सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा इशारा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील तहसील कार्यालये, तसेच ग्रामपंचायतींसमोरही निदर्शने करण्यात आली.
दररोज दोन-चार तरुण जीवनयात्रा संपवित आहेत. तरीही शासन जाणून-बुजून आरक्षणाचा हा मुद्दा लांबणीवर टाकत आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी मेगा भरतीला स्थगिती देत, राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मेगा भरती रद्द करावी अथवा स्थगिती द्यावी, अशी कोणतीही मागणी मराठा समाजाने केली नव्हती. तरीही ही स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची त्यांची घोषणाही फसवी असल्यानेच, आता आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. दिवसभर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, रवी खराडे, अजय देशमुख, रवींद्र काळोखे, श्रीरंग पाटील, शहाजी भोसले, महेश खराडे, महेश घार्गे, रोहित शिंदे, अनिल शेख, संजय भोसले, राहुल पाटील, धनंजय वाघ, प्रशांत भोसले, शेखर माने आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ग्रामसेवकांचा सत्कार
डॉ. संजय पाटील म्हणाले, गुरुवार, दि. ९ आॅगस्ट रोजी आंदोलन व्यापक केले जाणार आहे. जिल्ह्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी यादिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करावीत. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन ग्रामसेवकांना द्यावे. तसेच ग्रामसेवकाचा टॉवेल, टोपी व नारळ देऊन सत्कार करावा. सरपंचांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे.