जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:31+5:302021-07-23T04:17:31+5:30

सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलासाठी देव पाण्यात ठेवलेल्या सदस्यांनी आता अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस आणि ...

Movements for change of president in Zilla Parishad started | जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू

जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू

Next

सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलासाठी देव पाण्यात ठेवलेल्या सदस्यांनी आता अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न असून, गुरुवारी याची खलबते जिल्हा परिषदेत सुरू होती.

भाजपमधील एक मोठा गट अध्यक्ष बदलासाठी आक्रमक झाला आहे. सदस्य संभाजी कचरे यांचे सांत्वन करून सांगलीत परतलेल्या सदस्यांची दुपारी जिल्हा परिषदेत बैठक झाली. बदलासाठी आग्रही असणारे सदस्य यावेळी उपस्थित होते. पाठिंबा देणाऱ्या अन्य सदस्यांना फोनवरून चर्चेत सहभागी करून घेण्यात आले, शिवाय निर्णय पक्का झाल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांशीदेखील संधान साधण्यात त्यांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात आले, पण त्यांच्या अटी आणि शर्तींवर नंतर चर्चा होणार आहे.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांची निवड सव्वा वर्षांसाठी होती. हा कार्यकाल फेब्रुवारीतच संपला; पण भाजप नेत्यांनी बदल केला नाही. कोरोना काळात काम करता आले नसल्याचे सांगत कोरे यांनाच अप्रत्यक्षरित्या मुदतवाढ देण्यात आली. भाजप सदस्यांनी बदलासाठी वेळोवेळी नेत्यांकडे पाठपुरावा केला. गेल्याच आठवड्यात काही सदस्य कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आले, पण `करू, बघू` अशीच उत्तरे ऐकायला मिळाली. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ हेदेखील बदलामध्ये फारसे सक्रिय नसल्याने सदस्यांत अस्वस्थता आहे. खासदार संजय पाटील यांनी बदलासाठी पावले उचलली असली, तरी कार्यकारिणीकडून त्यांना पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे.

चौकट

सगळेच सत्तेत, विरोधक कोण?

नेत्यांच्या हालचाली नसल्याने सदस्यांनीच सूत्रे हाती घेतली आहेत. थेट अविश्वासाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठरावाची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी एका सदस्यावर सोपविली आहे. गुरुवारच्या बैठकीतून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांशी संपर्क केला असता, त्यांनीही पाठबळाची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत आता सगळेच सत्तेत, विरोधक कोणीच नाही, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

चौकट

असे आहे बलाबल

भाजप २६, शिवसेना ३, रयत ४, घोरपडे गट २ : एकूण ३५

काँग्रेस ७, राष्ट्रवादी १४, स्वाभिमानी शेतकरी १ : एकूण २२

अपात्रता सुनावणी सुरू असणारे सदस्य २

रिक्त १

Web Title: Movements for change of president in Zilla Parishad started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.