शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:20+5:302021-07-14T04:30:20+5:30

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता ...

Movements to start schools, then when will colleges open? | शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये कधी उघडणार?

Next

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेले दीड वर्ष सक्तीची कोरोना सुट्टी अनुभवणाऱ्या विद्यार्थी व पालकांतून आता शाळा सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत, मग महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते परिपूर्ण नाही. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहणार काय, याविषयी पालक, शिक्षक शंका व्यक्त करत आहेत. शासनाने दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांच्या भूमिका जाणून घेतल्या. ८० टक्क्यांहून अधिक पालकांनी शाळा सुरू करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू होणार आहेत. या स्थितीत महाविद्यालये का बंद ठेवली जाताहेत, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

निकालाचा गोंधळही कायम

दहावी आणि बारावीचा निकालही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाली तरी अकरावी आणि प्रथम वर्षाचे वर्ग रिकामेच राहणार आहेत. अभियांत्रिकी, आयटीआयची प्रवेश प्रक्रियादेखील पूर्ण झालेली नाही. या स्थितीत महाविद्यालये सुरू झाली तरी बारावीपासूनचेच वर्ग भरवावे लागतील. पण त्यामुळे शैक्षणिक प्रवाह सुरू होईल, अशी शिक्षक व पालकांना अपेक्षा आहे. लसीकरण झालेल्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.

कोट

काळजी घेऊन शिक्षण सुरू करा

दीड वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती आहे. या स्थितीत कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन महाविद्यालये सुुरू करणे योग्य ठरेल. कोरोना कधी संपणार, याची कोणतीही निश्चिती नाही. त्याला सोबत घेऊनच जगायचे आहे, हे गृहीत धरावे लागेल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काटेकोर काळजी घेत वर्ग सुरू करण्याविषयी विचार व्हायला हवा.

- प्रा. सुनीता माळी, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

कोरोनाची लाट ओसरत असली तरी महापालिका क्षेत्रात रुग्ण अद्याप सापडताहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी कमी होण्यासाठी प्रतीक्षा करावी. लाट ओसरल्याची खात्री होताच टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब आहेच, पण त्यांची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची आहे.

- प्रा. ईश्वराप्पा बिराजदार, वालनेसवाडी कनिष्ठ महाविद्यालय, वानलेसवाडी

कोट

बस झाली सुट्टी, आता वर्ग उघडा

दीड वर्षांच्या संघर्षानंतरही कोरोना पूर्णत: संपलेला नाही. या स्थितीत कोरोनाला घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाच्या भीतीने सारेच व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेविना उत्तीर्ण हे सर्वकाळ योग्य नाही. काळजी घेत वर्ग उघडले पाहिजेत.

- जयदीप पाटील, विद्यार्थी

ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून गुणवत्ता वाढत नाही. सध्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू आहे. शासनाने त्यांना प्राधान्याने लस देऊन वर्ग सुरू करावेत. लस घेतलेल्यांना वर्गात प्रवेश द्यावा. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची मर्यादा कमी करून जास्तीत जास्त लसीकरण करावे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

- विशाल जोशी, विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - ८६

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी संख्या ६७,९७३

Web Title: Movements to start schools, then when will colleges open?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.