आयर्विनला पर्यायी पुलासाठी जागा बदलण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:10 PM2020-03-11T15:10:33+5:302020-03-11T15:11:22+5:30
सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच पूल उभारायचा, याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच पूल उभारायचा, याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
आयर्विनच्या पर्यायी पुलावरून संघर्ष निर्माण झाला आहे. या पुलाला व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. सांगलीवाडीच्या नागरिकांचाही पुलाला विरोध आहे. आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाल्याने पर्यायी पुलाची मागणी होत होती.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठपुरावा करून पुलाला २५ कोटीचा निधी मंजूर करून आणला होता. मध्यंतरी सांगलीवाडीच्या नागरिकांनी पुलाचे काम बंद पाडले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा पुलाचे काम सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीतही पुलाच्या जागेवरून बराच वाद झाला. अखेर मंत्री पाटील यांनी स्थळ पाहणीनंतर निर्णय घेण्याची ग्वाही दिली. आता पुलाची जागा बदलण्याची चाचपणी सुरू झाली आहे.
नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध असेल तर पूल अन्यत्र स्थलांतर करता येतो का? हे तपासले जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे समजते. लवकरच या निवृत्त अधिकाऱ्यांसोबत मंत्री पाटील बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात आले.