मुलाला वाचविताना मावशीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 10:12 PM2019-06-07T22:12:06+5:302019-06-07T22:13:44+5:30
बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या डाव्या कालव्यात बहिणीच्या बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या मावशीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. इंदिरा तुकाराम जाधव (वय ३८, रा. वाकुर्डे, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. इंदिरा यांना वाचविण्यासाठी गेलेली त्यांची बहीण रंजना यशवंत पाटील (रा. मोहरे) मात्र बचावल्या.
इंदिरा बिळाशी येथील यशवंत दळवी यांच्या कन्या होत. त्या व रंजना सुटीसाठी काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. शुक्रवारी कपडे धुण्यासाठी त्या वारणा डावा कालव्यावरील शिराळकर डोहाजवळ गेल्या होत्या.
यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा यांचा मुलगा ओम, रंजना यांचा मुलगा सोहम व शेजारील यश साठे अशी तीन मुले होती. दोघी बहिणी कपडे धुण्यात व्यस्त होत्या. त्यावेळी यश याने पोहता येत असल्याने कालव्यात उडी मारली. हे पाहून त्याच्यापाठोपाठ सोहम व ओम यांनीही उड्या मारल्या. मात्र सोहमला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हे पाहून इंदिरा पाण्यात उतरल्या व त्यांनी सोहम आणि ओम या दोघांनाही बाहेर काढले. मात्र, पाणी वाहते असल्याने आणि वेगाचा अंदाज न आल्याने इंदिरा बुडू लागल्या. ही बाब रंजना यांच्या निदर्शनास येताच त्यांनी इंदिरा यांना पाण्याबाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली. विशेष म्हणजे रंजना यांना पोहता येत नसतानाही त्यांनी धाडस केले. एका हाताने त्यांनी कालव्याच्या काठावरील झाडाला घट्ट धरले, तर दोन्ही पायांमध्ये इंदिरा यांना धरून ठेवले होते.
दरम्यान, या घटनेने भयभीत झालेली तिन्ही मुले आरडाओरडा करत पळत सुटली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. रंजना यांचा भाऊ गुणवंत दळवी, कुमार शिराळकर, मयूर शिराळकर, बाबासाहेब परीट, बाबूराव पाटील, अक्षय लोहार, महेश लोहार, आकाश लोहार, दिनकर साळुंखे, अण्णा परीट, महादेव साठे आदींनी कालव्यात उडी घेतली व टायरट्यूब तसेच साडीच्या साहाय्याने दोघींना बाहेर काढले. मात्र, पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने इंदिरा बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना तात्काळ शिराळा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तथापि त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
इंदिराचे धाडस आणि मनाला चटका
बहिणीचा मुलगा बुडत असल्याचे पाहून, पोहता येत नसतानाही इंदिरा यांंनी पाण्यात उडी घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले व त्याचा जीव वाचविला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. त्यांनी धाडसाने बहिणीच्या मुलाचे प्राण वाचवले व स्वत: मृत्यूला कवटाळले. ही घटना मनाला चटका लावून जाणारी होती.
आज परतणार होत्या...
इंदिरा सध्या मुंबईला कुटुंबासह राहत होत्या. महिन्यापूर्वी त्या सुटीसाठी माहेरी आल्या होत्या. सुटी संपल्याने त्या शनिवारी मुंबईला जाणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.