खासदारसाहेब, सत्तेचा माज बाळगू नका!
By admin | Published: February 19, 2017 11:49 PM2017-02-19T23:49:23+5:302017-02-19T23:49:23+5:30
धनंजय मुंडे : सरकारची अवस्था अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी
तासगाव : सत्ता असल्यामुळे भाजपचे खासदार अंगात आल्यासारखे वागत आहेत. मात्र खासदारसाहेब, सत्तेचा माज बाळगू नका. शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत. राज्यातल्या सरकारची अवस्था ‘आयसीयू’मधील रुग्णासारखी आहे, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार संजयकाका पाटील यांना रविवारी लगावला.
तासगाव तालुक्यातील सावळज आणि विसापूर येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंडे यांची सभा झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, सुरेश पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
मुंडे म्हणाले की, आबांच्या जाण्याने जेवढे त्यांच्या कुटुंबाचे नुकसान झाले, तितकेच नुकसान राज्याचे व आमचेही झाले. मला विरोधी पक्षनेता करण्यामागे आबांचे मोठे योगदान होते. त्यांच्या विचारांचा वारसा कायम ठेवणार आहे. सत्तेच्या जिवावर खासदार उड्या मारायला लागले आहेत. पण शिवसेनेने पाठिंंबा काढून घेतला, तर उद्या तुमची गाठ आमच्याशी आहे. मौका सभी को मिलता है.
ते म्हणाले की, आम्ही सत्तेत नसलो तरी, आमच्या मनगटात ताकद आहे. सत्ताधाऱ्यांना वाकवून या भागाला पाणी मिळवून देण्याचे काम मी करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेली हड्डी असल्याचे स्वत:च सांगितले होते. नोटाबंदीनंतर नेमका काय फायदा झाला, हे सांगण्यास कोणीही तयार नाही. शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली.
ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १६ तारखेला जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दुसऱ्यादिवशी आयोगाने जाहीर केला असता, तर राज्यात राष्ट्रवादी पक्ष एक नंबरवर दिसला असता. शेतकऱ्यांच्या मनातील सरकार विरुध्दचा राग २१ तारखेला मतदानातून बाहेर पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी असल्याचे सांगतात. त्यांनी दुभत्या गाईची धार काढून दाखवावी. मार्चमधील उन्हाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर सरकारला सळो की पळो करुन सोडू. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्याची घोषणा करणाऱ्या भाजपवाल्यांनी १२२ कॅबिनेट झाल्या तरी अजूनही आरक्षणाचे नावही काढले नाही.
सावळज येथील सभेस जिल्हा परिषदेचे उमेदवार चंद्रकांत पाटील, सावळज गणाच्या उमेदवार मनीषा माळी, वायफळे गणाच्या उमेदवार शुभांगी पाटील, विसापूर गटाचे उमेदवार अर्जुन पाटील, विसापूर गणाचे उमेदवार दादासाहेब जाधव, बोरगाव गणाचे उमेदवार संभाजी पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
अशा आमदाराला जोड्याने मारले पाहिजे
सोलापूरचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत मुंडे म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नीबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदाराला जोड्याने मारायला हवे. भाजप देशभक्त असेल, तर या आमदाराला निलंबित करावे.