सांगलीत सोन्याचा व्यापार नव्हे... शुद्ध भगवा चालणार - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:55 PM2023-03-04T16:55:42+5:302023-03-04T16:56:36+5:30
माझ्याबद्दल हक्कभंगाची तक्रार करणाऱ्यालाच चौकशी समितीचा सदस्य म्हणून घेतले. ही समिती न्याय कसा देऊ शकेल?
सांगली : सांगलीत आता सोन्या-चांदीचा व्यापार चालणार नाही, शुद्ध भगवाच चालेल, तर मिरजेचे आमदार शिवसेनेशिवाय निवडून येऊ शकत नाहीत, असा टोला शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांना लगावला. सांगलीत शुक्रवारी शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
राऊत म्हणाले, गद्दारांबाबत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा दोन मिनिटांत जगभरात व्हायरल झाली. ते ४० जण जेथे जाताहेत, तेथे या घोषणा दिल्या जात आहेत. शिवसेना तुमच्या बापाने निर्माण केली काय? ती बाळासाहेब ठाकरे यांनी ५०-५५ वर्षांपूर्वी निर्माण केली. ही शिवसेना निवडणूक आयोगाने उचलून शिंदेंच्या घशात घातली, तेव्हापासून महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. त्यात गद्दार खाक होतील.
ते म्हणाले, मिरजेचे आमदार शिवसेनेशिवाय निवडून येऊ शकत नाहीत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात, मिरजेत रस्ते नाहीत. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोक्याच्याही वर घेतलेत. टक्केवारीसाठी गँगवाॅर करत आहेत.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आणायचे आहे. त्यासाठी सांगलीलाही वाटा उचलावा लागेल. महाराष्ट्र जिंकतो आणि सांगलीत मात्र नाही, असे यावेळी होणार नाही. सांगलीच्याच वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी शिवसेनेवर प्रेम केले. मात्र भाजप पाठीमध्ये खंजीर खुपसत आहे. आमचे भांडण ४० चोरांशी नाही. त्यांना आम्ही गाडू शकतो. आमचे भांडण भाजपशी आहे. कसब्याच्या ‘हम सब एक है’ पॅटर्ननुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड एकत्र राहतील.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील, हाजी सय्यद, लक्ष्मण हाक्के, अभिजित पाटील, दिगंबर जाधव, सुनीता पवार, सुजाता इंगळे, शहरप्रमुख मयूर घोडके, चंदन चव्हाण, चंद्रकांत मैगुरे, विशालसिंग रजपूत, पंडितराव बोराडे आदी उपस्थित होते. शंभोराज काटकर यांनी प्रास्ताविक केले.
चंद्रकांत पाटील कोथरूडला उभे राहणार का?
दरम्यान, पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, पुण्याची हवा पालटल्याचे कसब्याच्या निकालाने दाखवून दिले आहे. आता चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरुडमध्ये उभे राहणार का? राहुल गांधींसह माझे व अनेक नेत्यांचे फोन फडणवीस सरकारने टॅप केले. माझ्याबद्दल हक्कभंगाची तक्रार करणाऱ्यालाच चौकशी समितीचा सदस्य म्हणून घेतले. ही समिती न्याय कसा देऊ शकेल? विधिमंडळाला मी चोर म्हटलेले नाही. ४० गद्दारांपुरता उल्लेख केला होता.