राष्ट्रवादीची अनिल बाबर यांच्याशी; भाजपची वैभव पाटलांशी गट्टी; सांगलीत अनोखे त्रांगडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 04:57 PM2022-09-06T16:57:13+5:302022-09-06T17:20:11+5:30

आगामी निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांची चांगलीच कोंडी होणार.

MP Sanjaykaka Patil and MLA Anil Babar will have a big dilemma in the upcoming elections | राष्ट्रवादीची अनिल बाबर यांच्याशी; भाजपची वैभव पाटलांशी गट्टी; सांगलीत अनोखे त्रांगडे

राष्ट्रवादीची अनिल बाबर यांच्याशी; भाजपची वैभव पाटलांशी गट्टी; सांगलीत अनोखे त्रांगडे

Next

दत्ता पाटील

तासगाव : शिवसेनेच्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपची युती झाली. राज्यात युती असली तरी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात मात्र युतीचे अनोखे त्रांगडे आहे. विसापूर सर्कलमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटलांशी, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आमदार अनिल बाबर यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांची चांगलीच कोंडी होणार आहे.

खानापूर-आटपाडी मतदारसंघात तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा समावेश आहे. अटीतटीने होणाऱ्या निवडणुकीत, विसापूर सर्कलमधील मते निर्णायक राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आमदारकीला इच्छुक असणाऱ्यांचे या व्होट बॅंकेवर चांगलेच लक्ष असते. गतवेळच्या निवडणुकीत खासदार संजयकाकांसह त्यांच्या समर्थकांनी आमदार अनिल बाबर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय संदर्भ बदलले आहेत. काही महिन्यांपूर्वी मांजर्डे येथे झालेल्या कार्यक्रमात, खासदार संजयकाका पाटील यांनी घोड्यावर बसवायला जमतंय, तसं घोड्यावरून खाली घ्यायलाही जमत असल्याचा, सूचक इशारा बाबर यांना दिला होता. त्यामुळे बाबर आणि संजयकाका यांच्यात फारसे सख्य नसल्याची चर्चा आहे.

विसापूर सर्कलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संजयकाका पाटील समर्थकांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांची हजेरी वाढली आहे. वैभव पाटील यांनीही जिल्हा परिषद पंचायत, समितीच्या निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. त्यांची भाजपच्या कार्यकर्त्यांशी सलगी वाढल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे विसापूर सर्कलमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाबर यांच्याशी सलगी जुनीच आहे. बाबर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असला तरी, विसापूर सर्कलमध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून कोणतीही अडचण नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमदार बाबर यांच्या संपर्कात आहेतच किंबहुना सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी फिलगुडचे वातावरण आहे.

राज्यात शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी, विसापूर सर्कलमुळे भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे सूर आगामी निवडणुकांत कसे जुळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्य:स्थितीत बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आमदार आणि खासदारांची विसापूर सर्कलमध्ये कोंडीच झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: MP Sanjaykaka Patil and MLA Anil Babar will have a big dilemma in the upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.