वीज बिल घोटाळ्यात महावितरणही संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:52+5:302021-06-25T04:19:52+5:30
सांगली : महापालिकेच्या साडेपाच कोटी रुपयांच्या वीज बिल घोटाळ्यात महावितरण कंपनीचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महापालिकेला प्रत्यक्षात दिलेली ...
सांगली : महापालिकेच्या साडेपाच कोटी रुपयांच्या वीज बिल घोटाळ्यात महावितरण कंपनीचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महापालिकेला प्रत्यक्षात दिलेली बिले व ऑनलाइन बिलात मोठा घोळ दिसून येत आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून पुरवणी फिर्याद दाखल करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीची नव्याने मागणी करण्याची तयारी सुरू आहे.
महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलात साडेपाच कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बिलापोटी महापालिकेने दिलेल्या धनादेशातून खासगी ग्राहकांची बिले भरण्यात आली आहेत. याप्रकरणी महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह दोन पतसंस्थांतील कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली. दरम्यानच्या काळात महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेत पाच वर्षांतील वीज बिलाची पडताळणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या पडताळणीत घोटाळ्याची व्याप्ती वाढून साडेपाच कोटींवर गेली.
दरम्यान, नगरसेवक संतोष पाटील, नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सर्वच वीज बिलांच्या ऑडिटची मागणी केली आहे. सध्याचा घोटाळा हा पथदिव्यांच्या बिलांपोटीच मर्यादित आहे. महापालिकेची विविध कार्यालये, पाणीपुरवठा व इतर बिलांचीही पडताळणी झाल्यास घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही वीज बिलांचे विशेष लेखापरीक्षणासाठी राज्य शासनाला पत्र पाठविले आहे.
याच काळात महावितरण कंपनीने मात्र घोटाळ्याची जबाबदारी झटकली होती; पण महावितरणच्या सही- शिक्क्यानिशी दिलेल्या बिलांत महापालिकेची कुठेच थकबाकी दिसत नाही. स्थिर आकारात मात्र वाढीव रक्कम दिसून येते, तर ऑनलाइन बिलात मात्र थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेला सही, शिक्क्यानिशी चुकीची बिले देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही बिले कोठून देण्यात आली, त्यात स्थिर आकार का वाढविण्यात आला, याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुक्त कापडणीस यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांनाही पत्र लिहिले आहे, तसेच आता नव्याने पुरवणी फिर्याद देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.