संतप्त ग्रामस्थांनी शिराळा, सागाव येथील महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:59 PM2022-04-13T18:59:10+5:302022-04-13T19:00:06+5:30
शिराळा/पुनवत : शिराळा तालुक्यात आज, बुधवारी शिराळा, सागाव येथील महावितरणच्या कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीतील महिलांनी ...
शिराळा/पुनवत : शिराळा तालुक्यात आज, बुधवारी शिराळा, सागाव येथील महावितरणच्या कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीतील महिलांनी शिराळा कार्यालयास, तर सागाव येथील कार्यालयास शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. दरम्यान, वाकुर्डे, अंत्री येथील शेतकऱ्यांनी शिराळा कार्यालयावर मोर्चा काढला. उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिराळा विभागातील वीज पुरवठा कापरी विभागास जोडल्याने ग्रामीण विभाग व शहरी विभागाप्रमाणे भारनियमन आणि बिले मात्र शहरी दराने येत आहेत. त्यामुळे हा भाग शिराळा विभागास जोडावा, भरलेली बिलाची रक्कम ग्रामीण दराने आकारून फरक परत करावा अशी मागणी करीत प्राध्यापक कॉलनीतील शंभरावर महिलांनी आंदाेलन केले.
हे आंदोलन सुरू असतानाच अंत्री बुद्रुक, अंत्री खुर्द, वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द येथील वीजपुरवठा चार दिवस खंडित असताना कोणीही दाद घेत नसल्याचा आराेप करीत शेतकऱ्यांनी शिराळा कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, सागाव येथेही संतप्त ग्रामस्थांनी विजेचा लपंडावाला कंटाळलेल्या महिलांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले व संताप व्यक्त केला.