मुचंडीचे जंगल गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By admin | Published: June 6, 2016 11:51 PM2016-06-06T23:51:00+5:302016-06-07T07:32:24+5:30

परिसरात दहशत : एका महिन्यात दोन खून; आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ

Muchindi Jungle Criminals Shelter | मुचंडीचे जंगल गुन्हेगारांचे आश्रयस्थान

मुचंडीचे जंगल गुन्हेगारांचे आश्रयस्थान

Next

गजानन पाटील --संख जत तालुक्यातील मुचंडी-दरीबडची रस्त्यावरील असणाऱ्या वन विभागाच्या जंगलामध्ये मे महिन्यात झालेले दोन खून व आत्महत्येच्या प्रकाराने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. दाट जंगल, डोंगर, खोल दरी यामुुळे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करणे व आत्महत्या यासारख्या घटना घडत असल्याने हा निर्जन परिसर चर्चेत आला आहे. मुचंडी ओढा ते तोळबळवाडीपर्यंत रात्रीच्यावेळी प्रवाशांची वाटमारी, लूटमारी यासारख्या घटना घडतात. याला चाप बसविण्याचे व खुनासारख्या घटना रोखण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वात मोठा हा तालुका आहे. जत व उमदी दोन पोलिस ठाणी आहेत. पूर्व भागातील मुचंडी-दरीबडची रस्त्यालगत वन विभागाचे जंगल आहे. कर्नाटक सीमेलगत दऱ्याप्पा मंदिरापासून सुमारे ७ कि.मी. परिसराचा हा भाग वन विभागाचा आहे. या जंगलामध्ये बाभूळ, लिंब, चिंच, सुबाभूळ, डोंगरी, खैर, पिंपळ ही झाडे आहेत.
हा परिसर डोंगर-दऱ्यांचा आहे. या जंगलातील काही भागामध्ये तर स्थानिक गुराखी, मेंढपाळ, शेळ्या राखणारी माणसे वगळता, कोणीही फिरकत नाही. खोल दरी, मोठमोठ्या ओघळी आहेत. जंगलातून दऱ्याप्पा मंदिराला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. येथे तुरळक वाहतूक असते. रहदारी नसल्याने हा निर्जन परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान तसेच पे्रमीयुगुलांची अड्डे बनला आहे. कर्नाटक सीमेलगत हा परिसर असल्याने खून, मारामारी, आत्महत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावणे यासारखे गुन्हे घडतात. गेल्या महिन्यामध्ये एक खून, आत्महत्या व बेवारस महिलेचा खून यामुळे मुचंडी हा परिसर चर्चेत आला आहे.
जंगलामध्ये ९ मे रोजी सिध्दनाथ येथील अण्णाप्पा माने याचा थरारक पाठलाग करुन सिनेस्टाईलने त्याचाच पुतण्या व नातेवाईकाकडून निर्घृण खून करण्यात आला. या ‘खून का बदला खून’मुळे घडलेल्या दुहेरी खुनाने परिसरात खळबळ उडाली होती. २१ मे रोजी रावळगुंडवाडी येथील राघवेंद्र चन्नाप्पा हिरगोंड या युवकाने जंगलात आत्महत्या केली होती. त्याच्या आईने घातपाताची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २९ मे रोजी जंगलात खोल दरीमध्ये २५ ते ३० वर्षाच्या एका महिलेचा मृतदेह सापडला. तिचाही खून झाल्याचा संशय आहे. चेहरा ओळखता येऊ नये म्हणून अ‍ॅसिड टाकून पूर्णपणे विदु्रप केलेला होता. पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने अगदी निर्जनस्थळी झाडीमध्ये खोल दरीत हा मृतदेह टाकला होता. अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पूर्व भागातील मुचंडी-दरीबडची रस्त्यालगत वनीकरण व जंगलाला लागून कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. लिंगायत समाजाचे आराध्य दैवत धानम्मादेवी मंदिराकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. तेथे भाविकांची वर्दळ असते. गुड्डापूर फाटा हा बसथांबा आहे. लागूनच जंगलाची हद्द सुरु होते. अनेकदा येथे वाटमारीचे प्रकार घडले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पथक नेमून गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


दरीबडची-मुचंडी रस्त्यालगत जंगलामध्ये झालेला खून, घातपात, आत्महत्या यासारख्या घटनांमुळे हा परिसर संवेदनशील बनला आहे. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. वाटमारीचे प्रकारही वारंवार घडतात. पोलिसांनी परिसरात गस्त घालावी, जेणेकरून लोकांची भीती कमी होईल व त्यांचा रात्रीचा प्रवासही सुखाचा होईल.
- हरिश्चंद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ते, दरीबडची

Web Title: Muchindi Jungle Criminals Shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.