Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 12:45 PM2024-12-09T12:45:13+5:302024-12-09T12:47:30+5:30
शिगाव, खोची, कवठेपिरान गावांचे आरोग्य धोक्यात
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथे वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत. नदीचीपाणीपातळी वाढताच मळीमिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालेले आहे. नदीकाठावर सर्वत्र फेस जमा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मळीमिश्रीत पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत. दूषित पाण्यामुळे शिगाव, खोची, दूधगाव, कवठेपिरान, आदी अनेक गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी वारणा नदीला पहिले पाणी आले की, मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. शनिवारी पुन्हा पाणी सोडल्याने दुधगावजवळ मृत माशांचा खच पडल्याचे निदर्शनास आले. यामुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा गांभीर्याने पुढे आला आहे. पाणी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
दूषित पाण्याने मगरीचाही मृत्यू
वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिलाचाही मृत्यू झाला. रविवारी सकाळी मगरीचा मृतदेह नदीतून वाहत आल्याचे ग्रामस्थांना आढळले. त्यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. मात्र, सायंकाळपर्यंत मृत मगर नदीपात्रातच तरंगत होती. पाण्याला काळा रंग आला असून दुर्गंधीही पसरलेली आहे.
वारणेला दूषित पाणी आले असतानाही ग्रामपंचायत काहीही कार्यवाही करत नाही. गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मळीमिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्यांवर मोर्चा काढावा. मळीमिश्रित पाणी पुन्हा नदीपात्रात सोडले जाऊच नये, यासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे. - संदीप पाटील, ग्रामस्थ
नदीचे पाणी दूषित झाल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी शिल्लक पाणी पुरवून वापरावे. तसेच ते उकळून व शुद्ध करून प्यावे. - गिरीश पाटील, प्रभारी सरपंच, दुधगाव