मुकादम, ऊसतोडणी मजुरांना साखर आयुक्तांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:17+5:302021-09-23T04:29:17+5:30
सांगली : ऊसतोडणी मजूर आणि मुकादम शेतकऱ्यांकडे अवास्तव पैशांची मागणी करीत होते. याबाबत शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या ...
सांगली : ऊसतोडणी मजूर आणि मुकादम शेतकऱ्यांकडे अवास्तव पैशांची मागणी करीत होते. याबाबत शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. साखर आयुक्तांनी सर्व कारखानदारांना लेखी आदेश काढून पैसे घेणाऱ्या ऊसतोडणी मजूर, मुकादमांवर कारवाईची सूचना केली आहे.
गेल्या वर्षी २०२०-२१ च्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचे ऊसतोडणी मजूर आणि मुकादमाकडून आर्थिक शोषण झाले होते. काही शेतकऱ्यांकडे तर एकराला हजार रुपयांची मागणी झाली होती. प्रत्येक उसाने भरलेल्या ट्रॉलीमागे शंभर रुपये ते दीडशे रुपये मागणी होती. प्रत्येक तोडकऱ्यांसाठी अथवा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकासाठी जेवणाच्या डब्याचीही मागणी होती. शेतकऱ्यांना होत असलेला नाहक त्रास टाळण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना लेखी पत्रच दिले आहे. या पत्रामध्ये म्हटले की, ऊसतोडणी मजूर, मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित कारखाना व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल. येत्या हंगामात मुकादम, ऊसतोडणी मजूर शेतकऱ्यांकडे पैसे मागणार नाहीत याची कारखाना व्यवस्थापनाने काळजी घ्यावी, अशी सूचनाही केली आहे.