खासदार, आमदारांचे मौन; रुग्णालयावर बोलणार कोण?, तासगावातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पडले धूळखात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:17 PM2023-01-23T18:17:23+5:302023-01-23T18:17:53+5:30

हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण?

Multispeciality hospital of Tasgaon municipality questioned MP Sanjay Patil and MLA Sumantai Patil silent | खासदार, आमदारांचे मौन; रुग्णालयावर बोलणार कोण?, तासगावातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पडले धूळखात 

खासदार, आमदारांचे मौन; रुग्णालयावर बोलणार कोण?, तासगावातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पडले धूळखात 

googlenewsNext

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेने सव्वा सहा कोटी खर्चून बांधलेल्या कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी मौन धारण केले आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या भावी आणि माजी नगरसेवकांनीही या हॉस्पिटलबाबत
गांधारीची भूमिका घेतली आहे. राजकीय उदासीनतेमुळे वर्षभरापासून हे हॉस्पिटल धूळखात पडून आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी बोलणार तरी कोण, असा प्रश्न तासगावकरांना पडला आहे.

नगरपालिकेने शासनाकडून सहा कोटी ३० लाखांचा निधी मिळवून  शहरात प्रशस्त अशा कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली. ऑक्सिजन प्लांट्ससह शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभा राहिले. वर्षभरापूर्वी या हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, लोकार्पणानंतरही हे हॉस्पिटल धूळखात पडून आहे.

पुढाकार घेणार कोण?

ठेकेदारी आणि टक्केवारीत रस घेणारे तासगावचे कारभारीही सध्या गांधारीच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी शहरातून पुढाकार घेणार तरी कोण, असा प्रश्न तूर्तास तासगावकरांना पडला आहे.

हॉस्पिटल सुरू कसे करायचे?

प्रशिक्षित कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर आणायचे कुठून, असा प्रश्न नगरपालिका प्रशासनापुढे आहे. हॉस्पिटलच्या जागेवर यापूर्वी आरोग्य प्रशिक्षण पथक आणि डॉक्टर कार्यरत होते. त्यांचे स्थलांतर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात करण्यात आले. तिथूनच या पथकाचा कारभार सुरू आहे. वर्षभरात ना या पथकाला ही इमारत मिळाली, ना इमारतीला तज्ज्ञ डॉक्टर मिळाले.

उदासीनतेमुळे ठप्प

प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ कर्मचारी वर्ग आणि औषध पुरवठा होऊन जर जनतेला लाभ घ्यायचा असेल, तर या सर्व गोष्टींची पूर्तता शासनस्तरावर करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून सहकार्य मिळाले तरच हे हॉस्पिटल तासगावकरांच्या उपयोगी पडेल. मात्र, राजकीय उदासीनतेमुळे वर्षभरात याबाबत कोणतीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही.

श्रेयवाद अधिक

मतदारसंघात राजकीय कुरघोड्या, श्रेयवाद यासाठी आटापिटा करणाऱ्या नेत्यांनी हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. 

Web Title: Multispeciality hospital of Tasgaon municipality questioned MP Sanjay Patil and MLA Sumantai Patil silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.