मल्टिस्पेशालिटी रुग्णालय अखेर कुपवाडलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:49 PM2019-09-19T23:49:21+5:302019-09-19T23:49:26+5:30

सांगली : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. अखेर सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर वारणालीऐवजी कुपवाडच्या वाघमोडेनगरमध्ये ...

Multispecialty hospital finally gets to Kupwad! | मल्टिस्पेशालिटी रुग्णालय अखेर कुपवाडलाच!

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय अखेर कुपवाडलाच!

Next

सांगली : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. अखेर सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर वारणालीऐवजी कुपवाडच्या वाघमोडेनगरमध्ये खासगी जागा विकत घेऊन रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला नगरसेवक विष्णू माने व आनंदा देवमाने यांनी लेखी विरोध नोंदविला. वारणाली येथील जागेत मॅटर्निटी रुग्णालय उभारण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.
महापालिकेची सभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेला अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर (मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल) बांधण्यासाठी २०१४ मध्ये पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यात हे रुग्णालय वारणाली की वाघमोडेनगर (कुपवाड) असा वाद सहा महिन्यांपासून सुरू आहे. वाघमोडेनगर येथील जागा खासगी मालकीची असून, त्या जागेपोटी जमीनमालकाला ४७ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या जागेला विरोध होत होता. पण कुपवाडमधील दोन नगरसेवक वगळता इतरांचा वाघमोडेनगरच्या जागेला पाठिंबा होता.
सभेत विजय घाडगे म्हणाले की, कुपवाडला हॉस्पिटल होणे आवश्यक आहे. वारणालीच्या जागेचा ठराव महासभेत झालेला नाही. वारणालीमधील नागरिकांचाही रुग्णालयाला विरोध आहे. कुपवाड येथील वाघमोडेनगरची जागा भूसंपादन करून मूळ मालकाला टीडीआर द्यावा अथवा चालू बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावेत. शेडजी मोहिते म्हणाले की, कुपवाडला रुग्णालय व्हावे, ही मदनभाऊ पाटील यांची इच्छा होती. त्यामुळे वाघमोडेनगर येथील जागेवरच रुग्णालय बांधावे. राजेंद्र कुंभार व कल्पना कोळेकर यांनीही वारणालीच्या जागेला विरोध केला. प्रकाश ढंग यांनी दोन जागेचा वाद मिटत नसेल तर, तिसऱ्या जागेचा शोध घेण्याची सूचना मांडली.
भाजपचे आनंदा देवमाने व राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी मात्र वाघमोडेनगरच्या जागेला जोरदार विरोध केला. माने म्हणाले की, हॉस्पिटलसाठी तत्कालीन महासभेने वारणालीची जागा ठरवली आहे. या जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे. वाघमोडेनगर येथील जागेपोटी सव्वा कोटी मोजावे लागणार आहेत.
आनंदा देवमाने म्हणाले की, नव्या जागेला रस्ता नाही. भूसंपादनाच्या प्रक्रियेला तीन वर्षे लागतील. तोपर्यंत निधी परत जाईल. त्यामुळे वारणालीच्या जुन्या जागेतच रुग्णालय उभारावे, अन्यथा आमचा लेखी विरोध नोंदवावा.
उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, रुग्णालयाच्या जागेसंदर्भात महासभेने कोणताही ठराव केलेला नाही. वाघमोडेनगरची जागा संपादन करून तेथे रुग्णालय बांधता येईल, तर वारणाली येथे नवीन हेल्थ सेंटरचा प्रस्ताव तयार करता येईल.
महापौर संगीता खोत यांनी, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वारणालीऐवजी कुपवाड येथील वाघमोडेनगरच्या जागेत तातडीने बांधण्यासाठी जागा मिळवावी व वारणालीत हेल्थ सेंटर बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे आदेश प्रशासनाला दिले.
-------------
शेरीनाला योजनेचा पंचनामा
शेरीनाला योजना महापालिकेकडे हस्तांतरास सभेत विरोध करण्यात आला. ही योजना पूर्णत्वासाठी ३० कोटी रुपये लागणार आहेत. योजना पूर्ण होईपर्यंत हस्तांतर करून घेऊ नये, अशी भूमिका सर्वच सदस्यांनी मांडली. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शेखर इनामदार, स्वाती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला. जीवन प्राधिकरणचे सुनील पाटील यांनी, योजनेची काही कामे शिल्लक असून चाचणी झाली नसल्याची कबुली दिली. अखेर महापौर खोत यांनी, आठ दिवसात जीवन प्राधिकरणने उर्वरित कामांचा नवीन आराखडा करून शासनाला सादर करण्याचे आदेश दिले. त्यांनी हस्तांतरास अप्रत्यक्षपणे नकार दिला.

Web Title: Multispecialty hospital finally gets to Kupwad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.